पीटीआय, अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची शनिवारी युवाजन श्रमिक रायथू काँग्रेसच्या (वायएसआर काँग्रेस) आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी पक्षातर्फे ही निवड करण्यात आली. जगन यांची आजीवन अध्यक्षपदी निवड व्हावी यासाठी यापूर्वी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती.
जगनमोहन यांनी २०११ मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर ‘वायएसआर काँग्रेस’ची स्थापना केली आणि तेव्हापासून ते पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची आई विजयम्मा या मानद अध्यक्ष आहेत. जगन यांची यापूर्वी २०१७ मध्ये पक्षाच्या अधिवेशनात पक्षाध्यक्षपदी निवड झाली होती.
कुटुंबातील कथित मतभेदांमुळे विजयम्मा यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तथापि, विजयम्मा यांनी आपली मुलगी शर्मिला यांना आधार देण्यासाठी त्या पक्षत्याग करत असल्याचे स्पष्ट केले. शर्मिला शेजारच्या तेलंगणातील वायएसआर तेलंगणा पक्षाच्या अध्यक्षा आहेत. जगन यांना आजीवन पक्षाध्यक्षपदी ठेवण्यासाठी, पक्षाला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल. यामुळे पक्षाला दर दोन वर्षांनी या पदासाठी निवडणूक घेण्याची गरज भासणार नाही.