Lord Jaganannath Temple Ratna Bhandar : ओडिशा येथील भगवान जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडाराचे दरवाजे ४६ वर्षांनी खुले झाले. याआधी १९७८ मध्ये हे रत्नभांडार उघडण्यात आलं होतं. रत्नभांडाराचे दरवाजे उघडण्यासाठी ११ जणांची समिती तयार करण्यात आली. ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस विश्वनाथ यांच्या अध्यक्षतेखाली श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे चीफ अॅडमिनिस्ट्रेटर अरविंद पाढी, एएसआय अधीक्षक डी.बी. गडनायक आणि पुरीचे राजा गजपती महाराजा यांचाही या समितीत समावेश होता. या समितीच्या सदस्यांनी १४ जुलैच्या दिवशी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी या रत्नभांडारात प्रवेश केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरी मंदिराचे मुख्य प्रशासक अरविंद पाढींनी काय सांगितलं?

जगन्नाथ पुरी मंदिराचे मुख्य प्रशासक अरविंद पाढी यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नभांडारात असलेलं सामान हे सहा संदुकांमध्ये सील करुन ठेवण्यात आलं आहे. रत्नभांडाराच्या आतल्या भागात असलेला ऐवज अद्याप संदुकांमध्ये ठेवण्यात आलेला नाही. बहुडा यात्रा पार पडल्यानंतर हा ऐवज संदुकांमध्ये ठेवला जाईल. रत्न भांडारात असलेल्या रत्नांची, दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची मोजणी केली जाईल, तसंच काही मौल्यवान वस्तू दुरुस्त केल्या जातील. या सगळ्यांची संख्या, त्यांचा दर्जा, वजन, फोटो या बाबत एक डिजिटल कॅटलॉग तयार केला जाईल. रत्नभांडारात काय काय होतं याची माहिती अद्याप ११ सदस्यीय समितीने दिलेली नाही.

हे पण वाचा- Jagannath Rath Yatra : ‘या’ इंग्रजी शब्दाचे मूळ भगवान जगन्नाथाच्या नावात; इतिहास काय सांगतो?

प्रभू जगन्नाथाची पूजा झाल्यानंतर उघडण्यात आलं रत्नभांडार

भगवान जगन्नाथाची पूजा झाल्यानंतर रत्नभांडार उघडण्यात आलं. ११ सदस्यी समितीनेही आधी विधीवत पूजा केली. त्यानंतर देवाचा आशीर्वाद आहे हे समजूनच रत्नभांडारात प्रवेश केला. या रत्नभांडारात भगवान जगन्नाथाला वाहण्यात आलेले सोने, चांदी, हिरे यांचे अलंकार आहेत. ओडिशा मॅग्झिनने दिलेल्या माहितीनुसार राजा अनंगभीम देव या राजानेही भगवान जगन्नाथाचे दागिने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोनं दान केलं होतं.

१९७८ मध्ये जेव्हा रत्नभांडार उघडण्यात आलं तेव्हा काय काय होतं?

१९७८ मध्ये या रत्नभांडाराचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा या रत्नभांडारात १४० किलो सोन्याचे दागिने, २५६ किलोची चांदीची भांडी होती. पुरी मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार या अलंकारांवर मौल्यवान मणि जडवण्यात आले आहेत. २०१८ मध्ये ओडिशाचे कायदे मंत्री असलेल्या प्रताप जेना यांनी विधानसभेत ही माहिती दिली होती. मागील वर्षी जगन्नाथ मंदिर समितीने राज्य सरकारकडे ही शिफारस केली होती की रत्नभांडार २०२४ च्या रथयात्रे दरम्यान उघडण्यात यावं. या रत्नभांडारात अनेक नाग आणि साप आहेत आणि ते या खजिन्याचं रक्षण करत आहेत अशाही चर्चा झाल्या. मात्र ११ सदस्यीय समितीने दिलेल्या माहितीनुसार या खजिन्याजवळ कुठलाही साप किंवा नाग नाही.

रथयात्रे दरम्यान उघडण्यात आले रत्नभांडाराचे दरवाजे

४६ वर्षे रत्नभांडार का उघडण्यात आलं नाही?

दर तीन वर्षांनी पुरी येथील जगन्नाथ मंदिराचं रत्नभांडार उघडण्यात यावं आणि तेथील दागदागिने, मौल्यवान वस्तू यांची मोजणी करण्यात यावी असा नियमच आहे. मात्र ४६ वर्षे हे रत्नभांडार उघडण्यात आलं नाही. ओडिशा सरकारच्या संमतीनंतरच या रत्नभांडाराचे दरवाजे उघडले जातात. त्यासाठी दीर्घ न्यायालयीन प्रक्रिया पार पडली. भारतीय पुरातत्व विभागाच्या आग्रहानंतर २०१८ मध्ये ओडिशा उच्च न्यायालयाने ओडिशा सरकारला या मंदिरातील रत्नभांडार उघडण्यासाठी संमती द्या असे निर्देश दिले होते. त्यावेळी रत्नभांडाराच्या चाव्या हरवल्या आहेत असं न्यायालयात सांगण्यात आलं. मात्र अखेर १४ जुलै रोजी या रत्नभांडाराचे दरवाजे ४६ वर्षांनी उघडले. पुरी येथील खजिना लुटण्यासाठी १५ वेळा आक्रमण झालं आहे. ज्याची सुरुवात १४५१ मध्ये झाली होती. या वर्षापासून १७३१ पर्यंत १५ आक्रमणं झाली होती अशीही माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagannath puri temple ratna bhandar open after 46 year in 1978 what was found there scj