नवी दिल्लीत १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चालू आहे. संसदीय अधिवेशनाचा आज (२८ जून) पाचवा दिवस असून माजी मंत्री तथा भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चेला सुरुवात केली, तर राज्यसभेत भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी आभार प्रस्तावावर बोलण्यास सुरुवात केली. दरम्यान, विरोधी पक्षांमधील खासदारांनी या चर्चेसह NEET पेपर लीक प्रकरणावरही चर्चा घेण्याची मागणी केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये मोठा गोंधळ झाला. यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आलं. दरम्यान, यावेळी राज्यसभेचे सभापती विरोधी पक्षांच्या खासदारांवर संतापल्याचं पाहायला मिळालं.
राज्यसभेत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा बोलत असतानाच विरोधी पक्षांच्या खासदारांकडून घोषणाबाजी चालू होती. त्यानंतर सभापती जगदीप धनखड म्हणाले, आजचा दिवस भरतीय संसदेच्या इतिहासातला काळा डाग बनला आहे. विरोधी पक्षांचे नेते स्वतः सभापतींच्या टेबलासमोरील जागेत (होदात) आले. असं सभागृहात यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. हे पाहून मला खूप वेदना झाल्या आहेत. मला हे सगळं पाहून खूप आश्चर्य देखील वाटतंय. आपल्या संसदीय परंपरांचा, वरिष्ठ सभागृहातील सदस्यांच्या वागण्याचा स्तर इतका खाली कसा काय घसरू शकतो असा मला प्रश्न पडला आहे. त्यामुळेच सभागृहाचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करत आहोत.
सभापतींच्या टेबलासमोरी जागेत आलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन खर्गे देखील होते. सभापतींना राज्यसभेचं कामकाज तहकूब केल्यानंतर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधिंनी खर्गे यांना घडलेल्या घटनेबाबत विचारल्यावर त्यांना सभापतींनाच जबाबदार ठरवलं.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ही सगळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची चूक आहे. मी केवळ त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आत गेलो होतो. पण ते दिसत नव्हते आणि तेही माझ्याकडे किंवा विरोधक काय म्हणतायत याकडे लक्ष देत नव्हते, ते आमच्याकडे पाहतही नव्हते. नियमानुसार त्यांनी माझ्याकडे पाहायला हवं. परंतु, त्यांनी जाणीवपूर्वक माझ्याकडे दुर्लक्ष करून माझा अपमान केला. मग माझ्याकडे कोणताच पर्याय उरला नव्हता. त्यांचं लक्ष वेधण्यासाठी माझ्याकडे एकतर आत जाण्याचा पर्याय होता किंवा खूप जोरात ओरडावं लागणार होतं.
काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, देशात मोठमोठे घोटाळे झाले आहेत, NEET परीक्षा झाली, मात्र त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे लाखो मुलं त्रस्त आहेत. हा एक गंभीर विषय असून यावर सभागृहात चर्चा व्हावी असं आम्हाला वाटतं. आम्ही चर्चेची मागणी देखील केली. मात्र सभापतींनी आम्हाला संधी दिली नाही. आमच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे आम्हाला सभापतींचं लक्ष वेधण्यासाठी आमची जागा सोडून सभापतींच्या टेबलीसमोर जाऊन उभं राहावं लागलं.