Jagdeep dhankhar ask Congress MP mallikarjun kharge about his throat watch video : देशभरात गेल्या काही दिवसांपासून वक्फ सुधारणा विधेयक चांगलेच चर्चेत आले आहे. यावर गेल्या दोन दिवसांपासून संसदेत देखील जोरदार चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर बुधवारी (२ एप्रिल) मध्यरात्री लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर गुरूवारी (३ एप्रिल) मध्यरात्री २.३० वाजता राज्यसभेत देखील वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकावर संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान विरोधक आणि सत्ताधारी हे एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्यातील एका मजेशीर संवादाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
सभागृहात वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चेदरम्यान विरोधक आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार गोंधळ घालत होते. यादरम्यान धनकड यांनी अचानक मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांच्या गळ्याबद्दल प्रश्न विचारला. खरगे हे त्यांच्या भारदस्त आवाजासाठी ओळखले जातात. यादरम्यान राज्यसभा सभापतींनी तुम्ही तुमच्या घशासाठी काय घेता? असा प्रश्न खरगे यांना विचारला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे सभापतींनी मध्ये बोलणाऱ्या खासदाराला थांबायला सांगून खरगे यांना याबद्दल विचारणा केल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
नेमकं काय झालं?
या व्हिडीओमध्ये जगदीप धनखड हे सभागृहातील कामकाजादरम्यान खरगे यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. ते म्हणाले की, “खरगेजी, आपण घसा चांगला राहण्यासाठी काय घेता? (खरगेजी, आप गले के लिए क्या लेते हैं).” यावर काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे उत्तर देताना व्हिडीओमध्ये ऐकू येत आहेत. या प्रश्नावर खरगे म्हणाले की, “थोडं गरम पाणी पितो आणि माझ्या आईने जे दूध पाजलं त्याच्यावरच सगळं सुरू आहे.” पुढे धनखड यांनी असा वेगळा प्रश्न विचारण्याचं कारण देखील स्पष्ट केलं. “कारण तुमचा गळा खूप मजबूत आहे,” असे धनखड म्हणाले. यावर सभागृहात हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर
दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. यावर राज्यसभेत १२ तासांपेक्षा जास्त काळ चर्चा झाली. या मॅरेथॉन चर्चेनंतर अखेर वक्फ विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली, तर या विधेयकाच्या विरोधात ९५ मते पडली. आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवलं जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल.