Jagdeep Dhankhar Chairmen Of Rajya Sabha : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा एक देश एक निवडणूक विधेयक, अमित शाह यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचे वक्तव्य आणि संसदेच्या मकरद्वारापाशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे गाजला. या सर्व प्रकरणावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी उद्विग्न प्रतिक्रिया देत, “जग आपल्या लोकशाहीकडे पाहत आहे”, असे म्हटले आहे.
जग आपल्या लोकशाहीकडे…
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती असलेले जगदीप धनखड यांनी अधिवेशन काळातील खासदारांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “जग आपल्या लोकशाहीकडे पाहते. तरीही आपण आपल्या आचरणातून नागरिकांच्या अपेक्षा खोट्या ठरवतो. संसदेतील आपल्या वर्तनातून आपण जनतेच्या विश्वासाची आणि अपेक्षांची खिल्ली उडवत आहोत. आपले मूलभूत कर्तव्य नागरिकांची सेवा करणे आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत.”
या सर्व प्रकरणावर बोलताना राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड पुढे म्हणाले की, “जिथे तर्कसंगत संवाद व्हायला पाहिजे, तिथे आपण अराजकता पाहत आहोत. प्रत्येक खासदाराला, तो कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार न करता आवाहन करतो की, त्यांनी एकदा या सर्वांचा सद्सद्विवेकबुद्धीने विचार करावा.” जगदीप धनखड यांच्या या भावना भारताच्या उपराष्ट्रपतींच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आल्या आहेत.
अमित शाह यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विधान
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेत बोलताना, “आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची आता फॅशन झाली आहे. त्यांनी इतक्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर त्यांना स्वर्गात स्थान मिळाले असते”, असे म्हटले होते. अमित शाह यांच्या विधानानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक होत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
संसदेत धक्काबुक्की; दोन खासदार जखमी
अमित शाह यांच्या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी काल संसद भवन परिसरात इंडिया आघाडीच्या खासदारांनी पदयात्रा काढली होती. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी खासदार समोरासमोर आल्याने मकरद्वारापाशी धक्काबुक्की झाली. यामध्ये भाजपाचे प्रताप चंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत हे दोन खासदार जखमी झाले होते. यातील सारंगी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळे त्यांना दुखापत झाल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपाने दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती.