गेल्या काही दिवसांपासून महुआ मोईत्रा हे नाव चर्चेत आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर कॅश फॉर क्वेरी अर्थात संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात महुआ मोईत्रा यांची चौकशी चालू असून त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणातील तथ्यांची तपासणी केली जात असून सत्य अद्याप समोर आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर महुआ मोईत्रा यांच्यावर जय अनंत देहादराय यांनी गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केल्यामुळे मोईत्रा यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नेमकं काय झालंय?
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार जय अनंत देहादराय यांनी महुआ मोईत्रांविरोधात धमकावणीची तक्रार दाखल केली आहे. पेशानं वकील असणारे जय अनंत देहादराय यांनी ५ व ६ नोव्हेंबर रोजी महुआ मोईत्रा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय माझ्या घरी आल्याचा दावा केला आहे. “५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तर ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता महुआ मोईत्रा माझ्या घरी आल्या. अशा प्रकारे त्यांनी माझ्या घरात घुसण्याचा एकच हेतू मला दिसतोय. त्यांना माझ्याविरोधात आणखी चुकीच्या तक्रारी करून मला अडकवायचं असावं”, असं जय अनंत यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
“मी याआधीही दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना यासंदर्भात माहिती दिली आहे. महुआ मोईत्रा यांच्याकडून माझ्याविरोधात बनावट प्रकरणांच्या तक्रारी केल्या जात असल्याचंही मी सांगितलं आहे”, असंही जय अनंत यांनी म्हटलं आहे. “महुआ मोईत्रा माझ्या घरी मला धमकावण्यासाठीच आल्या होत्या असं वाटत होतं. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी”, असंही त्यांनी नमूद केलं.
काय आहे कॅश फॉर क्वेरी प्रकरण?
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये मोईत्रा यांनी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी मोठी लाच घेतल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे. खुद्द जय अनंत देहादराय यांनी पाठवलेल्या पत्राच्या आधारावरच दुबे यांनी हे आरोप केल्याचं सांगितलं जात आहे. आपल्याकडे मोईत्रा यांच्याविरोधात पुरावे असल्याचा दावा जय अनंत यांनी केला आहे.
दरम्यान मोईत्रा यांनी हे आरोप खोटे आणि मानहानीकारक असल्याचं सांगत निशिकांत दुबे व जय अनंत देहादराय यांनाच कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असून त्यांच्याकडे या आरोपांना बळ देईल असे कोणतेही पुरावे नाहीत, असं त्या म्हणाल्या आहेत. २ नोव्हेंबर रोजी महुआ मोईत्रा यांची संसदेच्या नितीमत्ता समितीसमोर सुनावणी झाली. मात्र, या चौकशीत आपल्याला आक्षेपार्ह प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.