काँग्रेस खासदार शशी थरूर हे त्यांच्या खास ट्वीट्समुळे आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता शशी थरूर यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना ‘थोडं शांत राहा’ अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ‘पाश्चिमात्य देश हे आपल्या म्हणजेच भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये नाक खुपसत असतात ही त्यांनी चुकीची सवय आहे.’ असं एक वक्तव्य एस. जयशंकर यांनी केलं होतं. त्यानंतर शशी थरूर यांनी, तुम्ही जरा शांत राहा अशी विनंती केली आहे.
काय म्हटलं आहे शशी थरूर यांनी?
“एस. जयशंकर हे माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांना प्रदीर्घ काळापासून ओळखतो. मात्र पाश्चिमात्य देशांबाबत त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबाबत मला असं वाटतं की एवढी टोकाची भूमिका त्यांनी घ्यायला नको. सरकार म्हणून आपण काही महत्त्वाची पावलं उचलली पाहिजेत. जर आपण प्रत्येक गोष्टीवर मतप्रदर्शन करत बसलो तर आपण आपलंच नुकसान करून घेतोय असं मला वाटतं. त्यामुळे मी माझ्या मित्राला सांगेन थोडं शांत राहा मित्रा.”
नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी एस. जयशंकर यांनी इतर देश आपल्या देशाच्या अंतर्गत घडामोडींमध्ये नाक खुपसत असल्याचं म्हटलं होतं. याबाबत पाश्चिमात्य देशांवर त्यांनी तिखट शब्दांमध्ये टीकाही केली होती. “पाश्चिमात्य देशांना हे वाटतं की इतर देशांच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये लक्ष घालणं हा देवाने त्यांना बहाल केलेला अधिकार आहे.” एस. जयशंकर यांनी हे वक्तव्य बंगळुरूतल्या मीट अँड ग्रीट या कार्यक्रमात केलं होतं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर जर्मनी आणि अमेरिका या दोन देशांनी त्यावर भाष्य केलं होतं.ज्यानंतर एस. जयशंकर यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यावर आता मित्रा थोडा शांत राहा असा सल्ला शशी थरूर यांनी त्यांना दिला आहे. NDTV ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.