तुरुंगाची वारी कधी घडू नये असे नेहमीच म्हटले जाते. पण आयुष्यात एकदा तरी तुरुंगात जाऊन बघावे अशी प्रत्येकाचीच सुप्त इच्छा असते. तुरुंगातील जीवन कसे असते याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. तुमची हीच इच्छा आता पूर्ण होऊ शकणार आहे. यासाठी तुम्हाला कोणता गुन्हा करावा लागणार नाही. तुम्हाला फक्त ५०० रुपये भरुन दिवसभर तुरुंगात राहता येणार आहे. तेलंगणमध्ये ही भन्नाट योजना राबवण्यात आली आहे.
तेलंगणधील मेडक जिल्ह्यात संगरेड्डी मध्यवर्ती कारागृह आहे. हे ऐतिहासिक कारागृह २२० वर्ष जूने असून निझामांच्या काळात या जेलचे बांधकाम झाले होते. या तुरुंगाला नुकताच हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला आहे. ‘जेलचा अनुभव घ्या’ या संकल्पनेवर आधारित  हॉटेल सुरु करण्याची योजना तुरुंग विभागातील उप अधीक्षक एम लक्ष्मी नरसिंह यांना सुचली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार या ऐतिहासिक जेलमध्ये आता पर्यटकांना राहणे शक्य होणार आहे. जास्तीत जास्त पर्यटकांवा आकर्षित करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
जेलमध्ये राहण्यासाठी पर्यटकांना प्रति व्यक्ती ५०० रुपये भरावे लागतील. यानंतर २४ तास जेलमध्ये राहून तुरुंगात कैद्यासारखा मुक्काम करता येईल. तुरुंगात हौस म्हणून आला असलात तरी एकदा आत गेल्यावर प्रत्येकाला तुरुंगाच्या नियमाचे पालन करावे लागेल. प्रवेश करतानाच पर्यटकांना कैद्यांचे गणवेश दिले जातील. यानंतर त्यांना पहाटे साडे पाचला उठून स्वतःची कोठडी साफ करावी लागेल. साडे सहाला चहा, साडे सातला नाश्ता आणि अकरा वाजता जेवण आणि रात्रीचे जेवण संध्याकाळी पाचला दिले जाईल. जेलमधील मुक्कामादरम्यान पर्यटकांना कैद्याप्रमाणेच तुरुंगातील कामे करावे लागतील. संध्याकाळी सहा वाजता दिवस संपेल आणि तुम्हाला पुन्हा कोठडीत बंद केले जाईल. तेलंगणमधील या तुरुंग पर्यटनाची सध्या देशभरात चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jail in telangana is letting tourists live a prisoners life
Show comments