बँकांच्या कृपाशीर्वादाने होणारी करचुकवेगिरी उघड करणारा हार्वे फाल्सियानी याला त्याच्या गैरहजेरीत पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
फाल्सियानी एचएसबीसी बँकेत आयटीतज्ज्ञ म्हणून काम करत होता. बेनामी पैसा कायदेशीर करून देण्यास मदत करणाऱ्या या बँकेची त्याने पोलखोल केली. हे प्रकरण ‘स्विसलीक्स’ नावाने ओळखले जाते. त्याच्याविरोधात स्वित्र्झलडच्या बँकिंग व्यवसायातील गोपनीयतेच्या कायद्यांचा भंग करणे, डेटा चोरी करणे, औद्योगिक हेरगिरी करणे अशा आरोपांखाली खटला चालविण्यात आला.
फाल्सियानी याने सध्या फ्रान्समध्ये आश्रय घेतला आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी स्वित्र्झलडमध्ये येण्यास त्याने नकार दिला होता. स्वित्र्झलडच्या सर्वोच्च न्यायालयात तो आपल्या शिक्षेविरोधात अपील करू शकतो. पण, तो फ्रेंच नागरिक असल्याने व फ्रान्स आपल्या नागरिकांचे हस्तांतरण करत नसल्यामुळे त्याला सुनावणीसाठी हजर राहण्याचे बंधन नाही.
बँकेच्या स्वित्र्झलडमधील खाजगी बँकींग विभागाने आपल्या जवळपास १ लाख २० हजार खातेधारकांना तब्बल १८१ बिलियन युरो लपविण्यास मदत केल्याचा दावा करणारी कथित कागदपत्रे फाल्सियानीने प्रसिद्ध केली होती.
दहशतवादाच्या प्रचारासाठी पाकिस्तानात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
वॉशिंग्टन : बंदी घालण्यात आलेल्या लष्कर ए तोयबा व जमात उद दवा या संघटनांना पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानात लष्कराकडून चालवल्या जाणाऱ्या एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांना समाजमाध्यमांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आयएसआय या गुप्तचर संस्थेचा यात हात आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सूत्रांनी सांगितले. आयएसआय ही गुप्तचर संस्था समाज माध्यमातील सायबर युद्धासाठी तरूणांना प्रशिक्षण देत आहे. फेसबुक व ट्विटरवर जमात उद दवा व लष्कर ए तोयबाचा प्रचार ते करीत असल्याचे या सुरक्षा सूत्रांनी स्पष्ट केले आहे.