आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याला शोधण्यासाठी सीआयए या अमेरिकी गुप्तचर संस्थेला मदत करणारा पाकिस्तानातील डॉक्टर कारागृहात असून त्याची सुटका करावी, या अमेरिकेच्या विनंतीबाबत पाकिस्तानने अद्याप कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे अमेरिकेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सदर डॉक्टरचे नाव शकील आफ्रिदी असून त्यांना कारागृहात डांबणे अन्यायकारक आहे. आम्ही सातत्याने जाहीरपणे आणि खासगीत पाकिस्तानकडे आमची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र त्यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानने कोणतेही आश्वासन दिलेले नाही. आफ्रिदी यांना कारागृहात डांबण्याला आमचा विरोध आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता मार्क टोनर यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.
पाकिस्तानातील नेत्यांसमवेत जेव्हा चर्चा होईल तेव्हा सर्वोच्च स्तरावर आम्ही हा प्रश्न सातत्याने उपस्थित करणार आहोत. डॉ. आफ्रिदी यांना माणुसकीची वागणूक देण्यात येत असून त्यांची प्रकृती उत्तम आहे, असे पाकिस्तान सरकारचे म्हणणे असले, तरी त्यांना कारागृहात डांबणे अन्यायकारक आहे, असे टोनर यांनी म्हटले आहे.
बनावट लसीकरण मोहीम राबविल्याच्या आरोपावरून डॉ. आफ्रिदी यांना २०१२ मध्ये ३३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या बनावट मोहिमेमुळेच लादेनचा अबोटाबादमधील ठावठिकाणा शोधण्यास अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला मदत झाली होती.

Story img Loader