बकरी ईदनिमित्त मुस्लिम समुदायात बकऱ्यांची कत्तल केली जाते. परंतु, जैन धर्मातील एका तरुणाने तब्बल १२४ बकऱ्यांचा जीव वाचवला आहे. यासाठी त्याने मुस्लिम बांधवांचा पेहराव केला होता. एवढे नव्हे तर १२४ बकरे खरेदी करण्याकरता त्यांनी १५ लाखांचा निधीही गोळा केला. जामा मशिदीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या चांदणी चौकातील मंदिराच्या प्रांगणात या बकऱ्यांना ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भातील सविस्तर वृत्त दि प्रिंटने दिलं आहे.
धरमपूर परिसरातील नया जैन मंदिरात बकरी ईदच्या दिवशी उत्साह दिसून आला. कसाईच्या तावडीतून वाचलेल्या बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी चांदणी चौकातील जैनांनी येथे गर्दी केली होती. हा दिवस बकरी दर्शनाचा दिवस होता. बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी मंदिरात होत होती. काहींनी त्यांच्या चाऱ्यासाठी पैसेही दान केले.
२५ जणांच्या टीमने केलं कार्य
दि प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, गुरू संजीव यांच्यामुळे ही योजना आखली गेली. त्यांनी २८ वर्षीय चिराग जैनला फोन केला. ईदच्या दिवशी होणारी बकऱ्यांची कत्तल त्यांना पाहवत नव्हती. बकऱ्यांची कत्तल होऊ नये म्हणून संजीव यांना काहीतरी करायचं होतं. “आपण सर्व बकऱ्या वाचवू शकत नाही. पण शक्य तितक्या वाचवुया”, असं चिराग म्हणाला. त्यासाठी एक योजनाही आखली गेली. १५ जूनच्या संध्याकाळी २५ जणांची टीम तयार करण्यात आली, या टीममध्ये सर्व जैन समाजातील लोक होते. आर्थिक योगदानासाठी व्हॉट्सॲप संदेशही प्रसारित करण्यात आला. त्यानंतर ज्या भागात शेळ्या विकल्या जात होत्या तिथे टीमने जाऊन सर्वेक्षण केले.
मुस्लिम बांधवांचा वेश परिधान केला
“आम्ही मुस्लिम समुदायाचे सदस्य असल्याचा पेहराव करून बकऱ्यांची किंमत विचारली. आम्ही शेळ्यांच्या मंडईचे (बाजार) सर्वेक्षण देखील केले”, असंही चिराग म्हणाला. १६ जून रोजी टीम गुप्तपणे विविध भागात गेली. जामा मशीद, मीना बाजार, मटिया महल आणि चितली काबर यांसारख्या जुन्या दिल्लीतील वेगवेगळ्या बकरी मार्केटमध्ये या टीमने सर्वेक्षण केलं. सर्व सभासदांना कुर्ते घालण्याची आणि बकऱ्यांची खरेदी करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना मिसळता येईल अशा पद्धतीने बोलण्याची सूचना देण्यात आली.
“आम्ही घाबरलो नव्हतो, पण खरेदीदारांनी आमच्या भावनांशी खेळावे अशी आमची इच्छा नव्हती. आम्ही गैर-मुस्लिम आहोत हे त्यांना कळले असते तर त्यांनी आम्हाला बकऱ्या जास्त किमतीत विकल्या असत्या आणि आम्हाला जास्तीत जास्त शेळ्या वाचवायच्या होत्या”, असं विवेक जैन म्हणाला.
सजीवांबद्दल संवेदना नव्हती
“बकऱ्यांची खरेदी प्रक्रिया कठीण होती. यामध्ये मोठा सौदा करण्यात आला. शेवटी, १० हजार रुपये सरासरी किमतीने बकऱ्या खरेदी करण्यात आल्या”, असं चिराग म्हणाला. मात्र, जुन्या दिल्लीतील मंडईंमध्ये या बकऱ्यांवर ज्या पद्धतीने उपचार करून त्यांची विक्री करण्यात आली, त्यामुळे विवेक घाबरला .“आम्ही रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून कपडे विकत घेत आहोत असे वाटले. बकऱ्या एकत्र कुस्करल्या गेल्या. या सजीव, श्वास घेणाऱ्या प्राण्यांबद्दल कोणतीही संवेदनशीलता नव्हती”, असं विवेकने तिरस्काराने म्हटलं.
“मंदिरातील धर्मशाळेतील अंगण, विवाहसोहळ्यांसाठी वापरले जाणारे हॉल यामध्ये या बकऱ्यांना आम्ही ठेवलं. जेव्हा टीममधील सर्व सदस्य बकऱ्यांना घेऊन तिथे आले तेव्हा आमच्या चेहऱ्यावर आनंद होता. आम्ही १०० हून अधिक बकऱ्या वाचवण्यात यशस्वी ठरलो होतो”, असंही विवेक म्हणाला.
१५ लाखांच्या निधीतून काय केलं?
जैन समुदायाने गुजरात, हैदराबाद, केरळ, पंजाब आणि महाराष्ट्रातील जैन समाजातील सदस्यांकडून १५ लाख रुपये गोळा केले. त्याच संध्याकाळी, विवेक, चिराग आणि इतरांनी उरलेला निधी भेंडी आणि पालकसारखा चारा खरेदी करण्यासाठी वापरला. ज्याच्या पोत्या अंगणाबाहेर ठेवल्या. व्हॉट्सॲप आणि फेसबुक ग्रुप्सवर एक संदेश प्रसारित करण्यात आला होता. या संदेशातून आवाहन करण्यात आले. “कृपया या उदात्त कार्यात योगदान द्या, जेणेकरून आम्ही काही प्राण्यांना कत्तल होण्यापासून वाचवू शकू. आम्ही या बकऱ्या जैन-संचलित गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांमध्ये पाठवू”, असं आवाहन करण्यात आल्याची माहिती माहिती विवेकने दिली.