Mob vandalises Thar Video : राजस्थानच्या जयपूर येथे एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने एसयूव्ही कार गर्दीत घुसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीख समुदायाकडून नगर कीर्तन मिरवणूक काढली जात होती यावेळी अचानक एक महिंद्रा थार गाडी गर्दीत घुसली. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी ही गाडी चालवणाऱ्या किशोरवयीन तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जयपूरच्या आदर्श नगर भागात रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. येथे शीख समुदायातील सुमारे ३०० लोक धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. दरम्यान या अपघातात एक वृद्ध व्यक्ती आणि एक बालक जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सध्या त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर संतप्त जमावाने या एसयूव्ही गाडीवर हल्ला करत तिची चांगलीच तोडफोड केल्याचे पाहायला मिळाले. महिंद्रा थार या गाडीमध्ये चार जण प्रवास करत होते, ज्यापैकी तीघे अपघात झाल्यानंतर लगेच घटना स्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणातील आरोपी किशोरवयीन चालक हा एका पोलीस कर्मचार्याचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान अपघातानंतर संतापलेल्या जमावाने गाडीची चांगलीच तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोक गाडीवर चढून काठीने काच फोडताना दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर अरघातग्रस्त कार जप्त करण्यात आली आणि किशोरवयीन चालकाला अटक करण्यात आली आहे. शीख समुदायातील नागरिकांनी या चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा>> मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी…
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री शेठी कॉलनी गुरूद्वारापासून गोविंद सिंग पार्क पर्यंत नगर कीर्तन यात्रा काढली जात होती. यावेळी रात्री साडेआठच्या सुमारास कीर्तन पंचवटी सर्कलजवळ पोहचले तेव्हा वेगाने आलेली थार जीप गर्दीत घुसली. घटनास्थळी उपस्थित पोलीसांनी गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने गाडी थांबवली नाही. यावेळी गाडीत चार लोक प्रवास करत होते, ज्यापैकी तीन जण तात्काळ फरार झाले. लोकांचा संताप पाहून जवळच्या पोलीस स्थानकातून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आणि जमावाला शांत करण्यात आले