Jaipur Gang Rape Case Update: कामावरून घरी परतल्यानंतर आपली २२ वर्षांची तरुण मुलगी घरी नसल्याचं पाहून तिच्या वडिलांना मोठा धक्का बसला होता…त्यांनी बराच शोध घेऊनही मुलीचा थांगपत्ता लागला नाही…त्याच दिवशी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर एक गाडी त्यांच्या घरासमोर थांबली आणि आतून त्यांच्या मुलीला अक्षरश: गाडीबाहेर फेकून देण्यात आलं.. ती जिवंत होती की नाही याचीही वडिलांना खात्री नव्हती! जयपूरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी वेगानं तपासाची चक्रं फिरवून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत!
नेमकं काय घडलं?
या सगळ्या प्रकाराबाबत जयपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिल्यानंतर नेमकं काय घडलं याचा खुलासा झाला आहे. ही घटना घडली ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री. जयपूरच्या जयसिंग पुरा खोर पोलीस स्थानकाच्या हद्दीत पीडित मुलगी व तिचे वडील वास्तव्यास आहेत. बुधवारी संध्याकाळी पीडीत मुलीचे वडील घरी परतल्यानंतर त्यांना मुलीचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे हवालदील झालेल्या वडिलांनी मुलीचा सर्वत्र शोध घोतला. पण त्यांना मुलगी सापडली नाही. या सगळ्यात मध्यरात्र उलटून गेली. शेवटी काय करायचं या विचारात असतानाच घराबाहेर एक गाडी येऊन थांबली.
मध्यरात्री १ च्या सुमारास त्यांच्या घराबाहेर एक एसयूव्ही कार थांबली आणि आतल्या नराधमांनी त्यांच्या मुलीला अक्षरश: बाहेर फेकून दिलं. नंतर गाडी सुसाट वेगात निघून गेली. आपली मुलगी निश्चल पडल्याचं पाहून वडिलांना प्रचंड धक्का बसला. तिचा मृत्यू झालाय की काय? अशी शंकाही त्यांना आली. त्यानंतर त्यांनी लागलीच तिला रुग्णालयात दाखल केलं.
पोलिसांनी काय सांगितलं?
जयपूर नॉर्थच्या पोलीस उपायुक्त राशी डोगरा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या धक्कादायक प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. “पीडित तरुणीच्या वडिलांनी १० ऑक्टोबर रोजी आमच्याकडे तक्रार दाखल केली. त्यात त्यांनी म्हटलं आहे की ते रात्री घरी परतले तेव्हा पीडिता घरी नव्हती. नंतर मध्यरात्री आरोपींनी पीडित तरुणीला त्यांच्या घरासमोर फेकून दिलं. तिची परिस्थिती गंभीर होती. तिचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते. त्यावरून तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचं स्पष्ट होत होतं. तिला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आम्ही चार आरोपींविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यातल्या दोघांना आम्ही २४ तासांच्या आत अटक केली तर रविवारी आम्ही इतर दोघांच्याही मुसक्या आवळल्या”, अशी माहिती राशी डोगरा यांनी दिली.
Crime: आईनं स्वतःच्या मुलीची दिली सुपारी; पण घडलं भलतंच, आईचाच झाला खून, ‘कहानी मे ट्विस्ट’ कसा आला?
तरुणीचा मृत्यू झाल्याचं वाटून आरोपींनी घरासमोर फेकलं
पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली बोलेरो गाडीही ताब्यात घेतली असून या चौघांची गुन्ह्यासंदर्भात कसून चौकशी केली जात असल्यांही राशी डोगरा यांनी स्पष्ट केलं. पीडितेचा मृत्यू झाल्याचा संशय आल्यामुळे आरोपींनी तिला तिच्या घरासमोर फेकून तिथून पळ काढल्याचं तपासात समोर आलं आहे.