Jaipur Hit and Run Accident Case : देशभरात दररोज वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता राजस्थानच्या जयपूरमध्येही ‘हिट अॅण्ड रन’चा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव वेगाने येणाऱ्या एसयूव्हीने अनेक पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
सोमवारी रात्री उशिरा जयपूरच्या एमआय रोड ते नाहरगड रोडवर एका कार चालकाने तब्बल डझनभर वाहनांना धडक दिली. तसेच अनेक पादचाऱ्यांना देखील चिरडलं. यात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. तसेच या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये कार चालक आपली कार भरधाव वेगाने चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच हा कार चालक दारूच्या नशेत होता आणि त्याने दारूच्या नशेत भरधाव कार चालवली, अशी माहिती सांगण्यात येत आहे.
अतिरिक्त पोलीस उपायुक्त बजरंग सिंह यांनी या या घटनेची माहिती देताना सांगितलं की, “ही घटना नाहरगड परिसरातील संतोषी माता मंदिराजवळ घडली. या घटनेतील कार जप्त करण्यात आली आहे. तसेच कार चालकालाही अटक करण्यात आलं आहे. या अपघातात सोमवारी रात्री रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. या घटनेतील सर्व मृतांची ओळख पटली आहे”, असं सिंह यांनी म्हटलं.
या घटनेच्या व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, कार नाहरगड परिसरातील एका वर्दळीच्या वसाहतीकडे वेगाने येत होती. त्यानंतर या गाडीने अनेक पादचाऱ्यांना आणि दुचाकींना चिरडलं. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी कारला घेराव घातला आणि कार चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणात आता कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.