जयपूर : जयपूर साहित्य महोत्सवात तिसऱ्या दिवशीचे सत्र गाजले ते सुधा मूर्ती आणि त्यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्यातील संवादाने. ‘माय मदर, माय सेल्फ’ या संवादसत्रात या माय-लेकीमधला रंगतदार, वैचारिक संवाद श्रोत्यांना ऐकायला मिळला. मुलगी आणि आई यांच्यातील सुंदर नातं दोघींनीही अलवारपणे उलगडलं.
मी लंडनमध्ये ‘लंडन साहित्य महोत्सवा’त सहभागी झाले होते, परंतु जयपूर साहित्य महोत्सवास- ज्यास अम्मा ‘साहित्याची काशी’ असे संबोधते तिथे मी पहिल्यांदाच आले आहे. आणि विशेष म्हणजे अम्मा आणि मी एकमेकींशी संवाद साधणार आहोत. संवाद हा आम्हा दोघींमधला महत्त्वाचा दुवा राहिला आहे. आमच्या दोघींमधले नाते माझ्या आयुष्यातील कधीही न संपणारा मौलिक खजिनाच आहे. मी इथे उपस्थित असलेल्या पालकांना आवर्जून सांगेन की, संवाद हाच पालक आणि मुलांमधला महत्त्वाचा दुवा आहे. तंत्रज्ञानामुळे आपण कितीही प्रगत झालो तरी माणसांतील संवादाला पर्याय नाही, हे आवर्जून सांगितले.
पुस्तकं ही आयुष्यात खूप महत्त्वाची असतात अशी शिकवण अम्मानेच दिली. पुस्तकं कळत-नकळत तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकतात, याची प्रचीती मला येत गेली. पुस्तकांमुळेच मला मूल्यशिक्षणाचे धडे मिळाले. अम्माने मला या पुस्तकांच्या जगात मुक्तपणे मुशाफिरी करायला दिली यासाठी मी तिचे खूप आभार मानते. पुस्तकामुळे माझी विज्ञान, तत्त्वज्ञान, मूल्यशिक्षण, राजकारण या विषयांशी ओळख झाल्याचे त्यांनी सांगितले. अम्माने माझा भाऊ रोहन आणि मला सांगितले होते की, जेव्हा तुमची शिकण्याची प्रक्रिया थांबते तेव्हा तुमचे जगणेही थांबते. आम्ही दोघांनीही तिची ही गोष्ट कायम स्मरणात ठेवली आणि आमच्या मुलांनाही तीच शिकवण देत आहोत.
सुधा मूर्ती म्हणाल्या की, माझं माहेर आणि सासर हे शिक्षकांसाठी ओळखलं जातं. त्यामुळे ज्ञान आणि पुस्तके हेच आयुष्यातील मोठी भेट असल्याची शिकवण मला मिळाली आणि तीच मी माझ्या मुलांमध्ये रुजवली. यावेळी त्यांनी आपल्या आजीचा किस्सा सांगितला की, माझ्या आजीला लिहिता-वाचता येत नव्हतं. मी लहान असताना तिने मला अक्षरांची ओळख करून द्यायला सांगितली. मी तिला उत्तम शिक्षकासारखं शिकवलं आणि ती चक्क तीन महिन्यांत अक्षरओळख शिकली. ती जेव्हा पहिल्यांदा वाचायला शिकली तेव्हा मी लहान असतानाही तिने गुरू म्हणून मला नमस्कार केला.
अक्षतानेच आपल्याला समाजकारणाकडे जाण्याचा मार्ग दाखवल्याची आठवण त्यांनी सांगितली. तिचा मित्र आनंद अभ्यासात खूप हुशार होता, परंतु त्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. तिने मला त्याच्यासाठी काहीतरी करण्यास सांगितले. मी पेपर तयार करण्याच्या कामात असल्याने तिच्या बोलण्याकडे फार लक्ष दिलं नाही. तेव्हा ती चिडून म्हणाली, ‘‘अम्मा, तू कोणासाठी काही करू शकत नाहीस तर तुला लोकांना उपदेश करण्याचा कोणताही हक्क नाही. तिच्या या एका वाक्याने मला समाजकारणाचा मार्ग दाखवल्याचा त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाला इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनकही उपस्थित होते.