जयपूर : कुठे देशविदेशातील नाववाले साहित्यिक आरामात फिरतायत, पुस्तकं पाहतायत… कुठे संगीताचे सूर कानांवर पडतायत… कुठे कुंचल्यातून कागदांवर चित्रं साकारतायत… आणि ही सगळी (नकली श्रीमंती नव्हे) अस्सल समृद्धी मन:पूत अनुभवत साहित्य-संस्कृतीप्रेमी आनंद लुटतायत… जयपूरच्या क्लार्क्स आमेर हॉटेलच्या भव्य वास्तूत असे वातावरण आहे.
जयपूरच्या क्लार्क्स आमेर हॉटेलची भव्य वास्तू… त्यात १८ व्या जयपूर साहित्य मोहोत्सवाची जोरदार तयारी… सगळीकडे साहित्य, कला, संगीत यांनी अक्षरश: भारलेला परिसर… देश-परदेशातील मान्यवर साहित्यिक, विचारवंत, कला-संगीतप्रेमी यांची वर्दळ… पाहताक्षणी हा जरा श्रीमंत वाटावा असाच कारभार… पण ही श्रीमंती केवळ सजावटीपुरतीच मार्यादित नाही, तर उत्तम दर्जेदार साहित्यिक, विचारवंत, अस्सल कलाप्रेमी पाहिले की हा महोत्सव खरंच साहित्य, कला, वैचारिक पातळींवरही श्रीमंती गाठतो याची झलक पहिल्या दिवसापासूनच दिसली. महोत्सवाचे उत्तम नियोजन… कार्यक्रमस्थळी येणाऱ्या साहित्यप्रेमींना कार्यक्रमस्थळांची माहिती देणारे, त्यांना तत्परतेने मार्गदर्शन करणारे स्वयंसेवक… ज्या लेखकांची पुस्तकं आपण वाचली आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद घेणारे वाचक… कार्यक्रमपत्रिकेनुसार कुठल्या कार्यक्रमाला हजेरी लावयची याचं नियोजन करणारी लाहन-थोर मंडळी… या महोत्सवात आवर्जून आपल्या मुलांना घेऊन येणारे पालक… एकाच वेळी दोन आवडीचे कार्यक्रम आल्याने जरा नाराज झालेली मंडळी… मग दोन जण असले की, तू या कार्यक्रमाला जा, मी हा कार्यक्रम पाहतो अशी कार्यक्रमांची वाटणी करणारे साहित्यप्रेमी… एखादा कार्यक्रम कसा झाला यावर तावातावाने चर्चा करणारे श्रोते… असाच सारा माहोल. खऱ्या अर्थाने साहित्य-कलेविषयी काहीतरी उत्तम घडतंय याचा प्रत्यय देणारं इथलं वातावरण. या महोत्सवात परेदशी साहित्यिक आणि विचारवंताचाही सहभाग मोठा. हे लोक इथल्या साहित्यपेमींना प्रेमाने भेटतात. त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. कोणताही बडेजाव नाही की आपण मोठे साहित्यिक असल्याचा आव नाही.
या महोत्सवात शाळेतील मुलंही आलेली… शाळेतल्या बाई त्यांना प्रत्येक दालन फिरवून इथे काय चाललं आहे याची माहिती देत होत्या. बाईंनी सगळ्यांना पुस्तकाच्या दालनात नेलं. तिथे एक डच लेखक स्वत:च्या पुस्तकावर स्वाक्षरी करत होते. त्याचं या मुलांना अप्रूप वाटत होतं. एक चित्रकार त्याच्या पुस्तकावर स्वत:च्या पुस्तकावर सुरुवातीच्या कोऱ्या पानावर पुस्तक विकत घेणाऱ्यांसाठी चित्र काढत होता. एक मुलगी कुतूहलानं ते पाहत होती. त्यानं तिच्या हाती ब्रश दिला आणि त्या चिमुकलीला चित्र काढायला सांगितलं. तिनं भीतभीतच हातात ब्रश घेतला आणि चित्र काढलं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय आणि तिच्यासाठी हा अनुभव कायम मनात साठवावा असाच… सुधा मूर्तींना पुस्तकावर सह्या करताना पाहून या शाळकरी मुलांना फार मज्जा वाटत होती… मुलांमध्ये साहित्यसंस्कार रुजवायचा म्हणजे नक्की काय असतं? तर याच प्रकारे हा संस्कार रुजवायचा असतो.
साहित्य-कला-संगीतात जितका खुलेपणा तेवढे ते अधिक समृद्ध होत जातात… याचाच प्रत्यय या महोत्सवात येतो.
संध्याकाळी हा परिसर संगीतमय झालेला… साहित्य-कला-संगीत यांनी ही वास्तूही भारावून गेलेली असते जणू…