Jaipur 3 killed in Flooded basement : राजस्थानची राजधानी जयपूरसह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस चालू आहे. जयपूरमधील अनेक भागांमध्ये, वस्त्यांमध्ये पाणी साचलं आहे. शहरातील रस्ते, विमानतळ, रेल्वेस्थानकं, पोलीस स्थानकं व रुग्णालयांमध्ये देखील पाणी शिरलं आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे जयपूरमध्ये दिल्लीमधील जुन्या राजेंद्र नगरमध्ये झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. जयपूरमधील विश्वकर्मा भागात पावसाचं पाणी एका तळघरात शिरलं. या तळघरात चार वर्षांच्या चिमुरडीसह तीन जण अडकले होते. या तिघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचं बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून तळघरातील पाणी काढण्याचं काम सुरू केलं आहे.
दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगर भागात एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरलं होतं. अनेक विद्यार्थी या तळघरात अडकले होते. त्यापैकी दोन तरुणी व एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे प्रकरण ताजं असतानाच जयपूरमध्ये याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या तळघरातील पाणी काढण्याचं काम चालू आहे. मदत व पुनर्वसन विभागाचे कर्मचारी, बचाव पथक, अग्निशमन दल मिळून तळघरातील पाणी काढण्याचं काम करत आहेत. अद्याप एकही मृतदेह हाती लागलेला नाही. मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांची ओळख पटवता येईल असं पालिका प्रशासनाने म्हटलं आहे.
हे ही वाचा >> Wayanad landslides : “आम्ही २३, २४, २५ व २६ जुलै रोजी…”, वायनाडमधील दुर्घटनेवरून अमित शाहांचं केरळ सरकारकडे बोट
मुसळधार पावसामुळे जयपूरच्या अनेक भागांमध्ये घरं कोसळल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. राजधानीमधील जामडोली भागात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस आणि एक प्रवासी बस रस्ता खचल्याने अडकली आहे. या घटनेत कोणालाही मोठी इजा झालेली नाही. मात्र बस खड्ड्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.
हे ही वाचा >> भूस्खलनातील मृतांचा आकडा १६७; १९१ बेपत्ता, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
केरळ व उत्तर भारतात पावसाचं थैमान
मुसळधार पावसामुळे केरळमधील अनेक भागांमध्ये पूर आला आहे. वायनाड जिल्ह्यात भूस्खलन होऊन २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. ही घटना ताजी असतानाच आता उत्तर भारतातही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे दिल्लीच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्याचबरबर उत्तराखंडमध्येही अतिवृष्टी चालू आहे. केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर लिनचोलीजवळ ढगफुटीची घटना घडली आहे. त्यामुळे काहीच क्षणात मंदाकिनी नदीची जलपातळी वाढली आहे. ढग फुटल्याने ओढे, नाले तुडुंब भरून वाहतायत. तसेच, केदारनाथला जाणारी पदयात्रा विस्कळीत झाली आहे. पदयात्रेच्या मार्गावरच ढग फुटल्याने ५० ते २०० तीर्थयात्रेकरू अडकल्याचं वृत्त समोर आलं आहे.