जगाला वेढा टाकलेल्या करोनाचं संकटाचा भीती अजूनही कमी झालेली नाही. जगभरात करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तर दुसरीकडे करोना प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. भारतातही आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं मदतीसाठी हात पुढे केला होता. भारतानेही ब्राझीलला लस पुरवठा करण्यास परवानगी दिल्यानंतर राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत.
भारताने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं लसीची मागणी केली होती. ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांनी तसं पत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं होतं. ब्राझीलकडून करण्यात आलेल्या मदतीच्या मागणीला भारतानं सकारात्मक प्रतिसाद देत लस पुरवण्यास सुरूवात केली. भारताकडून लसींचे डोस पाठवण्यात आल्यानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्विट करत आभार मानले.
“जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल आभार,” असं म्हणत बोलसोनारो यांनी म्हटलं आहे.
Namaskar, Prime Minister @narendramodi
Brazil feels honoured to have a great partner to overcome a global obstacle by joining efforts.
Thank you for assisting us with the vaccines exports from India to Brazil.
Dhanyavaad! धनयवाद
— Jair M. Bolsonaro (@jairbolsonaro) January 22, 2021
बोलसोनरो यांच्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिसाद दिला आहे. “बोलसोनारोजी, कोविड महामारीविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी ब्राझीलचा विश्वासू सहकारी होणं हा आमचा सन्मान आहे. आरोग्यसेवांवरील आपलं सहकार्य भारत बळकट करत राहिलं,” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
The honour is ours, President @jairbolsonaro to be a trusted partner of Brazil in fighting the Covid-19 pandemic together. We will continue to strengthen our cooperation on healthcare. https://t.co/0iHTO05PoM
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2021
“आम्हाला लस पाठवा”
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. भारतात ही लस कोविशिल्ड नावाने बाजारात आणली गेली आहे. “ब्राझीलमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम तातडीने सुरू करण्यासाठी भारतातील लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कोविड लसीचे २० लाख डोस तातडीने पाठवावे,” असं बोलसोनारो यांनी पत्रात म्हटलं होतं.