रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही थांबलेले नाही. या युद्धामुळे वेगवेगळ्या देशातील नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतातील अनेक नागरिक तसेच वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थीदेखील युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या सर्वांना युद्धभूमीवरुन भारतात परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवले जात आहे. मात्र याच मोहिमेवरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्यसभा सदस्य तथा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या मोहिमेला मंत्र्यांच्या पातळीवरील तमाशा असं म्हटलंय. त्याबरोबरच त्यांनी मोदी सरकार येण्याआधी आतापर्यंत किती नागरिकांची अशा प्रकारे सुटका करण्यात आली याची माहितीच दिली आहे.
“युक्रेनमधून भारतीयांची सुटका करण्याच्या मोहिमेची पंतप्रधानांकडून बढाई मारली जात आहे. याआधीही कोणताही प्रचार न करता तसेच धामधूम न करता लोकांना परदेशातून परत आणण्यात आले आहे. २०११ साली लिबियामधून जवळापास १५००० भारतीयांना परत आणण्यात आले होते. २००६ मध्ये लेबनॉन या देशातून २३०० भारतीयांना मुक्त करण्यात आले होते. १९९० मध्ये तर तब्बल १ लाख ७० हजार नागरिकांना भारतात सुखरुपपणे परत आणण्यात आले. यावेळी मंत्र्यांनी कोणताही तमाशा केला नव्हता,” अशा शब्दात जयराम रमेश यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी भारत सरकारतर्फे ऑपरेशन गंगा राबवले जातेय. या मोहिमेंतर्गत युक्रेमधील विविध भागात अडकलेल्या नागरिकांना विमानद्वारे भारतात आणण्यात येतंय. त्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांची एक टीम नियुक्त करण्यात आलीय. मंत्र्यांची ही टीम तसेच बचाव पथकाच्या मदतीने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात यश आलंय. युक्रेनमधून रेस्क्यू करण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये मंत्री युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांशी तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतायत. तसेच भारतात परतल्यानंतर काही मंत्री या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे स्वागत करत असल्याचेही व्हिडीओ समोर आले आहेत. याच मुद्द्याला घेऊन जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी तसेच भारत सरकारवर वरील टीका केली आहे.