नव्या संसद भवनात हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू असताना दोन तरुण सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात शिरले. दोघांनीही संसदेत मोठा राडा केला. हे दोन्ही तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात असले तरी संसदेच्या सुरक्षाभंगाच्या या गंभीर घटनेचे तीव्र पडसाद गुरुवारी (१५ डिसेंबर) संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. विरोधकांनी सरकारकडे सुरक्षेतील त्रुटीसंदर्भात सविस्तर स्पष्टीकरण मागितलं. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्याऐवजी १४ विरोधी खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे. शिवाय, संसदेत पूर्वी झालेल्या सुरक्षाभंगाच्या घटनांची यादी वाचून दाखवत केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांना राजकारण न करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची नाही असं म्हणत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी केंद्र सरकारचा बचाव केला.
असभ्य वर्तन केल्याप्रकरणी १४ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रह्लाद जोशी यांनी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. सुरूवातीला काँग्रेस खासदार टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबिन करण्यात आलं होतं. त्यानंतरही गदारोळ थांबला नसल्याने आणखी नऊ खासदारांना निलंबित केलं. यामध्ये बेनी बेहानन, मोहम्मद जावे, पीआर नटराजन, कनिमोझी, व्ही. के. श्रीकंदन, के सुब्रमण्यम, एसआर पार्थिबन, एस वेंकटेशन आणि मणिकम टागोर यांचा समावेश आहे. तर, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओ ब्रायन यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.
दरम्यान, काही वेळाने डीएमके खासदार एसआर पार्थिबन यांचं निलंबन रद्द करण्यात आलं. गोंधळ करणाऱ्या लोकसभा सदस्यांच्या नावांची यादी करताना चूक झाली असल्याचं प्रह्लाद जोशी यांनी सांगितलं. यावरून काँग्रेसने सरकारला टोला लगावला आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्वर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, काल लोकसभेत जे काही झालं ते खूप चिंताजनक होतं. आज लोकसभेत झालं ते खूपच विचित्र होतं. तमिळनाडूचे एक खासदार संसदेतच नव्हे तर नवी दिल्लीतही नव्हते त्यांना लोकसभेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं आहे. परंतु, ज्या भाजपा खासदाराच्या मदतीने दोन्ही आरोपी सभागृहात घुसले त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही.
हे ही वाचा >> संसद घुसखोरी प्रकरण : सूत्रधार ललित झाचं दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण
दरम्यान, काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी म्हटलं आहे की, हे निलंबन म्हणजे एक प्रकारचा विनोद आहे. एस. आर. पार्थिबन आज लोकसभेत नव्हते. परंतु, त्यांनाही निलंबित करण्यात आलं. मला वाटतंय ते एका तामिळी बांधवाला दुसऱ्यापासून वेगळं करू शकत नाहीत.