आम आदमी पक्षाची हेटाळणी करू नका, असा सल्ला देणाऱ्या केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांना काँग्रेस पक्षाकडून घरचा आहेर मिळाला आहे. ज्यांनी कधी कार्यकर्त्यांसोबत काम केले नाही, पक्ष स्थापनेमागील कष्ट सोसले नाही, फारसे कष्ट न करता ज्यांना सत्ता मिळते, त्यांना पक्षबांधणीचे महत्त्व समजणार नाही, असा टोला जयराम रमेश यांचे नाव न घेता काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी लगावला. ‘आप’चे दशावतार प्रत्येक राज्यात असल्याचे सांगत रमेश यांनी ‘आप’वर टीका करू नका, असे काँग्रेससह अन्य पक्षांना बजावले होते.
रमेश यांच्या विधानामुळे ‘आप’ला अवास्तव महत्त्व मिळाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये उमटली आहे. द्विवेदी म्हणाले की, केवळ एका राज्यात ‘आप’ला यश मिळाले. भारत खूप मोठा देश आहे. जे अतिउत्साही असतात, त्यांनाच हे बोलणे सुचते. कारण पक्ष चालवणे अत्यंत काम आहे. केवळ भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर अरविंद केजरीवाल यांना एका राज्यात यश मिळाले आहे. भ्रष्टाचार ही प्रत्येक राज्याला सतावणारी समस्या आहे. त्या विरोधात लोकांमध्ये राग आहे. काही लोकांनी एकत्र येऊन भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला व त्यापासून आम आदमी पक्षाची निर्मिती झाली. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे आताच ‘आप’विषयी काहीही म्हणणे उचित ठरणार नाही, असेही द्विवेदी म्हणाले. ज्यांनी पक्ष चालविताना होणाऱ्या यातना अनुभवल्या नाहीत, त्यांना पक्षासाठी काय करावे लागते, याची जाणीव होणार नाही. अशांना आपचे यश फार मोठे वाटते, असा टोला द्विवेदी यांनी रमेश यांना लगावला.
गेल्या कित्येक दिवसांपासून काँग्रेसचे मंत्री लोकपाल विधेयकाच्या मंजुरीसाठी झटत आहेत, असे सांगत द्विवेदी यांनी लोकपालचे श्रेय अण्णा हजारे व केजरीवाल यांना देण्यास नकार दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा