पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे कायदामंत्री राणा सनाउल्लाह यांनी गुरुवारी रात्री स्पष्ट केले. मसूद अझरला नक्की अटक झाली आहे की नाही, यावरून निर्माण झालेले शंकेचे वातावरण यामुळे काही प्रमाणात निवळणार आहे.
पाकिस्तानातील ‘डॉन न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनाउल्लाह म्हणाले, पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी मसूद अझर याला ताब्यात (सुऱक्षात्मक कोठडी) ठेवले आहे. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जर या हल्ल्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले, तरच त्याला अधिकृतपणे अटक करण्यात येईल.
बंदी घालण्यात आलेल्या ‘जैश ए मोहम्मद’च्या पाकिस्तानातील विविध कार्यालयांविरोधात सुरू असलेली कारवाई पुढील काळातही चालूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहशतवादाविरोधातील राष्ट्रीय मोहिमेनुसारच ही कारवाई करण्यात येत अल्याचे सनाउल्लाह यांनी सांगितले.
भारताने दोन जानेवारीलाच मसूद अझर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पठाणकोटच्या हवाईतळावर हल्ला घडवून आणल्याचे पाकिस्तानला सांगितले होते. मसूदचा भाऊ रौफ आणि त्याच्या पाच साथीदारांनी हा कट रचला होता. या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा दल यशस्वी ठरले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा