पुलवामा हल्ल्यासह भारतातील अनेक हल्ल्यांमागे हात असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-महंम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप पाकिस्तानकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार २ मार्च रोजी मसूदचा मृत्यू झाला आहे. मात्र, टाइम्स नाऊच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या परवानगीनंतर मसूदच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरैशी यांनी म्हटले होते की, माझ्या माहितीप्रमाणे मसूद खूपच आजारी आहे. तो इतका आजारी आहे की तो आपल्या घरातूनही बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे या वृत्ताची आता बरीच चर्चा होत आहे. मसूद अजहर हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. त्याच्यावर पठाणकोट एअर बेसवर दहशतवादी हल्ल्याचा आरोप आहे. भारतासह अमेरिका, युके आणि फ्रान्स या देशांनी मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, चीन या मार्गात अडथळा आणत होता.

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या (एनआयए) माहितीनुसार, पंजाबमधील पठाणकोटमध्ये हवाई दलाच्या बेस कॅम्पवर दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात मसूदचा हात आहे. त्याच्या ‘जैश’ या दहशतवादी संघटनेने १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला होता, या हल्ल्याची जबाबदारी याच दहशतवादी संघटनने घेतली होती. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. मसूद अजहरच्या ‘जैश’ने गेल्या दोन दशकात भारतावर अनेकदा हल्ले केले आहेत. यांपैकी २००१ मध्ये संसद भवनावर झालेल्या हल्ल्याचा तो सुत्रधार आहे. त्यानंतर २०१६ मध्ये पठाणकोट एअर बेस हल्ला, त्यानंतर याच वर्षी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला दहशतवादी हल्ला यामध्ये मसूदचाच हात आहे.

दरम्यान, शनिवारी मसूदचा भाऊ अम्मार याचा एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये त्याने त्यांच्या ठिकाणांवर भारतीय हवाई दलाने हल्ले केल्याचे म्हटले आहे. भारतीय विमानांनी त्या ठिकाणी हल्ले केले जिथे ‘जैश’ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असे. पाकिस्तानी पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. या हल्ल्यामध्येच मसूद अजहर जखमी झाल्याचेही सांगण्यात येत होते. त्यानंतर तो रुग्णालयात उपचार घेत होता. दरम्यान, २ मार्च २०१९ रोजी त्याचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानमधील माध्यमांतील वृत्तामध्येही म्हटले आहे. मसूद अजहर अनेक काळापासून किडनी आणि लिव्हरच्या आजाराने ग्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.