लंडन : कॅनडात हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानी फुटीरतावाद्याच्या हत्येत भारतीय हस्तकांचा हात असल्याच्या कॅनडाच्या आरोपांबाबत तपास करण्यास भारत नकार देत नाही, मात्र कॅनडाच्या दाव्याच्या पुष्टयर्थ त्या देशाने पुरावा द्यावा अशी आमची इच्छा आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.
‘एक अब्ज लोक जगाकडे कसे पाहतात’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार लिओनेल बार्बर यांच्याशी संवादादरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात जयशंकर यांनी हे वक्तव्य केले.
‘अशाप्रकारचा आरोप करण्यासाठी तुमच्याजवळ काही कारण असेल, तर कृपया तो पुरावा आम्हालाही द्या. आम्ही तपासास आणि त्याच्याकडे देण्यासारखे असेल ते पाहण्यास नकार देत नाही. मात्र त्यांनी आतापर्यंत तसे केलेले नाही’, असे पाच दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर असलेले जयशंकर एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
हेही वाचा >>> इस्रायलचे दक्षिण गाझामध्ये कारवाईचे संकेत- पॅलेस्टिनींना स्थलांतर करण्याचे आदेश
‘कॅनडाच्या राजकारणाने भारतापासून फुटण्याची भलामण करणाऱ्या हिंसक आणि अतिरेकी राजकीय मतांना जागा दिली आहे व त्यात हिंसक उपायांचाही समावेश आहे. या लोकांना कॅनडाच्या राजकारणात सामावून घेण्यात आले आहे. त्यांना त्यांची मते स्पष्टपणे मांडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे’, असेही जयशंकर यांनी सांगितले. भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चित जबाबदारीसह येते आणि या स्वातंत्र्याचा दुरुपयोग आणि राजकीय कारणांसाठी हा दुरुपयोग सहन करणे अतिशय चुकीचे ठरेल, असे जयशंकर यांनी कॅनडातील खलिस्तान समर्थक कारवायांचा संदर्भ देऊन सांगितले. या मुद्दय़ावर आपण आपल्या कॅनडाच्या समपदस्थ मेलनी जोली यांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.
कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ले किंवा उच्चायुक्तालय आणि महावाणिज्य दूत यांच्यावरील स्मोक बॉम्ब हल्ले यांची जयशंकर यांनी आठवण करून दिली. भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना जाहीररीत्या धमकावण्यात आले, मात्र कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी दोषींविरुद्ध कुठलीही कारवाई केली नाही, याचाही त्यांनी उल्लेख केला.
भारत-बांगलादेश यांचे ‘आदर्श नातेसंबंध’ प्रादेशिक सहकार्याचा विचार करता भारतीय उपखंडात भारत व बांगलादेश यांचे संबंध ‘आदर्श नातेसंबंध’ या स्वरूपाचे आहेत, असे एस. जयशंकर यांनी गेल्या दहा वर्षांत द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेली प्रगती अधोरेखित करताना म्हटले आहे. येथील रॉयल ओव्हरसीज लीगमध्ये संवादात्मक कार्यक्रमात बांगलादेशच्या ब्रिटनमधील उच्चायुक्त सईदा मुना तस्नीम यांनी विचारलेल्या प्रश्नाला जयशंकर यांनी उत्तर दिले.