S Jaishankar On Deportation In Rajya Sabha : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विरोधी पक्षांनी अमेरिकेने अवैधपणे राहत असलेल्या भारतीय स्थलांतरितांना मायदेशी पाठवणे आणि प्रयागराज महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीसह अनेक मुद्द्यांवरून सरकारले घेरल्याचे पाहायला मिळाले. याचबरोबर विरोधी पक्षांनी राज्यसभेत गोंधळही घातला. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले होते. यानंतर दुपारी २ वाजता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेने १०४ भारतीय स्थलांतरितांना माघारी पाठवल्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले.
परदेशात अवैधपणे…
यावेळी राज्यसभेत अवैध स्थलांतरावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, “जर एखाद्या देशाचे नागरिक परदेशात अवैधपणे राहत असतील, तर अशा प्रत्येक देशाने त्यांच्या नागरिकांना परत देशात घ्यायलाच पाहिजे. हे त्यांचे कर्तव्य आहे.”
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेत अवैधपणे गेलेल्या भारतीयांच्या मुद्द्यावर संसदेच्या नियम २५१ अंतर्गत निवेदन दिले. यावेळी त्यांनी सांगितले की ही कारवाई अमेरिकेच्या नियमांनुसार करण्यात आली आहे. अशी कारवाई यापूर्वीही करण्यात आली आहे. ही काही नवीन प्रक्रिया नाही.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले की, निर्वासितांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, भारतीयांना अवैधपणे देशाबाहेर पाठवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या एजंट आणि एजन्सींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ते म्हणाले, “अमेरिकेतून परत आलेल्या प्रत्येक भारतीयासोबत बसून ते अमेरिकेत कसे गेले, एजंट कोण होता याची चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.”
१०४ भारतीयांना अमेरिकेने मायदेशी पाठवले
बुधवारी, अमेरिकेत राहणाऱ्या १०४ अवैध भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. या स्थलांतरितांपैकी ३० जण पंजाबचे, हरियाणा आणि गुजरातचे प्रत्येकी ३३ जण, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी तीन जण आहेत, तर दोन जण चंदीगडचे आहेत. यामध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केले की, “अमेरिकेतून माघारी पाठवण्यात येत असलेल्या भारतीयांशी कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी आम्ही अमेरिकन सरकारशी चर्चा करत आहोत.”