राफेल डील प्रकरणी संसदेत चर्चा झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहत उपस्थित नव्हते. मोदी यावेळी सभागृहातून पळून गेले, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणावर चर्चा करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भलं मोठं भाषण दिलं, मला शिवीगाळही केली मात्र आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत, अशी माहिती देत राहुल यांनी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.


राहुल गांधी म्हणाले, राफेल डीलप्रकरणी पंतप्रधानांनाच आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. याची उत्तरे त्यांनीच देणे अपेक्षित आहेत. यासंदर्भात चार-पाच प्रश्न आहेत, राफेल विमानांची ५२६ वरुन १६०० कोटींपर्यंत किंमत हवाई दलाने की पंतप्रधानांनी वाढवली?, लष्कराने ३६ कि १२६ विमानांची मागणी केली? अनिल अंबानींना कंत्राट कोणी दिलं? जुना १२६ विमानांचा करार रद्द करुन ३६ विमानांचा नवा करार बनवला त्यावर हवाई दलाचा आक्षेप होता की नाही? हे प्रश्न राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विचारले. तसेच संसदेत जेव्हा संरक्षणमंत्री पंतप्रधानांच्यावतीने या विषयावर बोलतील तेव्हा त्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आव्हानही त्यांनी संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांना दिले.

फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष ओलांद यांनीही अनिल अंबानींना कंत्राट देण्यास मोदींनी सांगितल्याचं म्हटलं आहे. जी डसॉल्ट कंपनी या विमानांची निर्मिती करणार आहे. या कंपनीच्या अंतर्गत ई-मेलमधील संवादात भारत सरकारने त्यांना राफेल डील प्रकरणाचे ऑफसेट कंत्राट केवळ अनिल अंबानींनाच देण्याची सूचना केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच या व्यवहारापोटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींना ३०,००० कोटी रुपयेही देऊ केल्याचा पुनरुच्चार यावेळी राहुल गांधी यांनी केला.

Story img Loader