संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या सूचनेवरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची पत्नी आणि कन्येसाठी गोव्यात नौदलाचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमातील एका वृत्ताद्वारे करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. जेटली यांनी मात्र या वृत्ताचे जोरदार खंडन केले आहे.
दाभोळ विमानतळावरील रिसॉर्टमधून दक्षिण गोव्यातील काणकोण येथे जाण्यासाठी २३ डिसेंबर रोजी जेटली यांची पत्नी आणि कन्येला नौदलाचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमातील एका वृत्ताद्वारे करण्यात आल्याने खळबळ माजली; तथापि हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचा दावा फेसबुकवरून करताना जेटली यांनी त्याबाबतची तीन कारणे दिली आहेत.
गोव्यात २३ डिसेंबर रोजी आपली पत्नी आणि पुत्र (कन्या नव्हे) होते, त्यांनी कोणत्याही सरकारी सुविधेचा वापर केला नाही, नौदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर तर नाहीच नाही आणि मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्यासाठी संरक्षण दलाच्या कोणत्याही हेलिकॉप्टरचा वापर करण्यास मंजुरी दिलेली नव्हती, असे जेटली यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या कुटुंबीयांची गोवा भेट खासगी स्वरूपाची होती आणि कुटुंबीय गोव्यात आहेत त्याची पर्रिकर यांना कल्पनाही नव्हती, असेही अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.