अरविंद केजरीवाल यांचा केवळ असत्यता आणि बदनामी याच्यावर विश्वास असल्याचा पलटवार केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरुवारी केला. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढविला.
दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष असताना अरूण जेटली यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने गुरुवारी सकाळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरूण जेटली यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशीही मागणी आपच्या नेत्यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी हा ब्लॉग प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येक नागरिकाला मिळालेला घटनात्मक हक्क आहे. मात्र, त्याचा अर्थ एखाद्याने कायम खोटेच बोलावे का? अरविंद केजरीवाल यांचा असत्यता आणि बदनामीवरच विश्वास आहे, असे जेटली यांनी म्हटले आहे.
दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपच्या नेत्यांनी जेटलींवर गंभीर आरोप केले होते. दिल्लीमध्ये क्रिकेटचे मैदान तयार करण्यासाठी डीडीसीएने २४ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती. पण प्रत्यक्षात ११४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. जेटली हे ‘एलिट क्लब’प्रमाणे डीडीसीएचा कारभार चालवत होते, असे आरोप करण्यात आले होते.