पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, यावरून पक्षात कोणताही वाद असू नये. कारण त्यामुळे स्वयंचित होण्याचाच धोका अधिक असतो आणि तेच आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्षाच्या पराभवाचे मुख्य कारण ठरू शकते, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे.
भाजपच्या कायदेविषयक आणि विधिमंडळ कक्षाच्या परिषदेत जेटली बोलत होते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हे जाहीर केले पाहिजे, असेही जेटली यांनी या वेळी सूचित केले.
केंद्रातील यूपीए सरकारला विविध समस्यांनी ग्रासले असून नेतृत्वाच्या प्रश्नाचीही यूपीए सरकारला बाधा झाली आहे. यूपीएमध्ये परिणामकारक नेतृत्वाचा अभाव आहे आणि त्यामुळेच जनता भाजपकडे आशेने पाहत आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणे भाजपच्या हिताचे आहे, असेही जेटली म्हणाले.
एखाद्या नेत्याला अफाट लोकप्रियता मिळत असल्याने संसदीय निवडणुका या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसारख्याच आहेत, असे मत व्यक्त करताना जेटली यांनी अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी आणि पं. जवाहरलाल नेहरू यांची उदाहरणे दिली.
पुढील सार्वत्रिक निवडणुका या नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून लढल्या तर भाजपला निश्चितच विजय मिळणार आहे. मात्र, नेतृत्वावरून कोणताही वाद उफाळून आल्यास त्याचा भाजपला फटका बसेल, असा इशाराही जेटली यांनी दिला. आपण स्वयंचित होऊ नये, आपल्याला कोणीही गोलंदाजी करीत नाही, तरीही केवळ चुकीमुळे आपण स्वयंचित होतो आणि कदाचित त्यामुळेच आपल्याला पराभवाची चव चाखावी लागेल, असेही ते म्हणाले.
भाजपला गेल्या दोन निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे, मात्र सध्या जनभावना भाजपच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता नेतृत्वाचा वाद टाळण्याची नितांत गरज आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांवर टीका
राज्यसभेत शाब्दिक चकमक उडाल्यानंतर अरुण जेटली यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर निशाणा साधला . पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या वर्तणुकीतून क्रोध आणि निराशा अधोरेखित होत असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी त्यांच्याकडे आता कल्पनाशक्तीच राहिली नसल्याचे दिसून येते, असे जेटली यांनी म्हटले आहे.
राज्यसभेत देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात पंतप्रधानांनी केलेल्या निवेदनाबाबत जेटली म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे सांगण्याऐवजी ते क्रोधित झाले आणि त्यांनी निराशावादी वक्तव्य केले. त्यामुळे पंतप्रधानांकडे कल्पनाशक्ती राहिली नसल्याचे स्पष्ट होते, असेही जेटली म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा