— समीर जावळे, जळगाव
देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच बसावेत अशी इच्छा जळगावातल्या महिलांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातले अनेक प्रश्न सोडवले आहेत. महिला वर्गाला भेडसावणारे प्रश्नही त्यांनी काही प्रमाणात सोडवले आहेत. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की त्यांनीच पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसावे. जळगावात खान्देश पापड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पापड महोत्सवात जळगाव, रावेर येथील महिलांचा समावेश आहे. या सगळ्या महिलांशी लोकसत्ता ऑनलाईनने संवाद साधला, यावेळी त्यांनी ‘अब की बार मोदी सरकार’चाच नारा दिला.
जळगावाच्या पापड महोत्सवात आलेल्या दीपाली पोटे सांगतात, मोदींनी सुरू केलेली उज्ज्वला योजना फायद्याची आहे त्यामुळे गावोगावी गॅस पोहचला. त्यांना आणखी एकदा संधी दिली तर ते निश्चितच लोकाभिमुख कामं करतील तसेच महिलांसाठीचे, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न सोडवतील. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय निर्मिती करण्यात येते आहे. त्यामुळेही महिलांना मोठा आधार मिळतो आहे, असंही त्या म्हणाल्या. नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला हा निर्णय देशहिताचा आहे असंही पोटे यांनी सांगितलं.
याच पापड महोत्सवात सुरतहून आलेल्या वर्षा वाणी यांनीही मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाच विजयी होईल अशी खात्री आहे. असंही त्या म्हणाल्या. एक चौकीदार म्हणून मोदी देशासाठी जे कार्य करत आहेत ते आजपर्यंत कोणीही केलं नाही. एक चहावाला देशाचा पंतप्रधानपदापर्यंत जाऊन पोहचला याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे. आयुष्यमान कार्ड, माँ कार्ड, सुकन्या योजना, पंतप्रधान आवास योजना या सगळ्या योजनांचा आम्हाला फायदा होतो आहे असंही वाणी यांनी सांगितलं.
याच पापड महोत्सवात आलेल्या सीमा चव्हाण सांगतात, पुन्हा एकदा भाजपाचच सरकार येईल आणि पंतप्रधानपदाी नरेंद्र मोदीच विराजमान होतील. इतक्या वर्षात जे झालं नाही ते गेल्या पाच वर्षात होताना आम्हाला दिसतं आहे. मोदी जर पुन्हा सत्तेवर आले तर महिलांचे प्रश्न आणखी सुटतील त्यांना एक संधी द्यायला हवी, त्यामुळे मोदीच पुन्हा सत्तेवर यावेत अशी आमची इच्छा आहे. नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला तेव्हा सुरूवातीचे काही दिवस त्रास जाणवला पण आता काहीही त्रास नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. एकंदरीत काय तर बचतगटात सहभागी झालेल्या सगळ्याच महिलांनी ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ हाच नारा दिला आहे.