ब्रिटिश राजवटीत झालेले जालियाँवाला बाग हत्याकांड हा लाजिरवाणा प्रकार होता, असे मत ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी बुधवारी व्यक्त केले. या हत्याकांडाबद्दल भारतीय जनतेची माफी मात्र त्यांनी मागितली नाही. या हत्याकांडाबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी काही संघटनांनी केली होती.
कॅमेरून यांनी हत्याकांड झालेल्या ठिकाणाला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील या निर्घृण हत्याकांडाबद्दल खेद व्यक्त करणारे ते पहिले ब्रिटिश पंतप्रधान होत. जालियॉंवाला बागेत ९४ वर्षांपूर्वी १९१९ मध्ये झालेल्या हत्याकांडात एक हजारांपेक्षा अधिक भारतीय मृत्युमुखी पडले होते. कॅमेरून यांनी येथील अमर ज्योतीसमोर गुडघे टेकून तसेच एक मिनिट मौन पाळून मृतांना आदरांजली वाहिली. ते येथे सुमारे पंचवीस मिनिटे होते. त्यानंतर त्यांनी येथील नोंदवहीत नोंद केली. ‘ब्रिटिश इतिहासातील जालियॉंवाला बाग हत्याकांड ही अत्यंत लाजिरवाणी दुर्घटना होती. विन्स्टन चर्चिल यांनी तिचे वर्णन ‘पाशवी’ अशा योग्य शब्दात केले आहे. येथे जे काही घडले ते आपण कधीही विसरता कामा नये. जगभरात शांततामय निदर्शने करणाऱ्यांना ब्रिटनचा नेहमीच पाठिंबा राहील, याची खबरदारी घेतली पाहिजे.’
जालियाँवाला बाग येथे १३ एप्रिल १९१९ रोजी सुमारे २० हजार लोक निषेध सभेसाठी जमले होते. त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश ब्रिगेडिअर जनरल रेजिनाल्ड ई.एच.डायर याने दिला. निश:स्त्र नागरिकांवर गोळीबाराच्या १६५० फैरी झाडण्यात आल्या. त्यात हजारपेक्षा जास्त मृत्युमुखी पडले आणि हजारो जण जखमी झाले.
एक नजर इतिहासावर..
१९१९ : महात्मा गांधी यांची रौलेट कायद्याविरोधात सत्याग्रहाची हाक, देशव्यापी प्रतिसाद, पंजाबमध्ये हिंसाचार, जाळपोळ.
१३ एप्रिल १९१९ : पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू. अमृतसरमध्ये जमावबंदी. त्याच दिवशी अमृतसरच्या हरमंदिर साहेबनजीक जालियाँवाला बागमध्ये बैसाखीनिमित्ताने १५ ते २० हजार शिख, हिंदू आणि मुस्लिम नागरिक सभेसाठी जमा. सभा सुरू झाल्यानंतर सुमारे एक तासाने, साडेचार वाजता ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड ई. एच. डायर ६५ गुरखा आणि २५ बलुची व पठाण सैनिकांच्या तुकडीसह बागेत दाखल. यातील ५० जणांकडे .३०३ ली-एनफील्ड रायफली. डायरने कोणतीही पूर्वसूचना न देता लोकांवर गोळीबार सुरू केला. सुमारे एक हजार ६५० गोळ्या झाडल्याचा अंदाज. त्यात इंग्रज सरकारच्या म्हणण्यानुसार ३७९, तर काँग्रेसने केलेल्या चौकशीनुसार दीड हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले.
ब्रिटिशांची प्रतिक्रिया : पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओडवायर याच्याकडून डायर यांना शाबासकी. मात्र विन्स्टन चर्चिल यांच्याकडून ‘पाशवी हत्याकांड’ या शब्दांत तीव्र निषेध.
१३ मार्च १९४० : हत्याकांडाचा बदला म्हणून मायकेल ओडवायर याची लंडनमध्ये उधमसिंग यांच्याकडून हत्या.
डायरवर सेवामुक्तीची कारवाई : तो इंग्लंडला परतल्यानंतर त्याचा अनेकांकडून सन्मान. रुडयार्ड किपलिंगकडून त्याच्यासाठी २६५० पाउंडचा गौरवनिधी गोळा. मात्र अनेक ब्रिटिश नागरिकांकडून त्याच्यावर टीकेचाही वर्षांव. १९२७ मध्ये त्याचा आजारपणाने मृत्यू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा