जालियनवाला बागेमध्ये ‘त्या’ दिवशी जे काही घडले, ती ब्रिटिशांच्या इतिहासातील अतिशय लाजीरवाणी घटना होती, या शब्दांत ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी बुधवारी आपली भावना व्यक्त केली. कॅमेरून यांनी जालियनवाला बागेला भेट दिली. गेल्या ९४ वर्षांत या स्थळाला भेट देणारे ते ब्रिटनचे पहिलेच पंतप्रधान आहेत.
जालियनवाला बागेतील अभ्यागतांसाठीच्या वहीमध्ये लिहिलेल्या संदेशात कॅमेरून यांनी म्हटले आहे, ब्रिटिशांच्या इतिहासातील ही सर्वांत लाजिरवाणी घटना होती. विन्स्टन चर्चिल यांनी तिचे घृणास्पद म्हणून केलेले वर्णन सुयोग्य आहे. या जागेमध्ये काय घडले, हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्या घटनेची आठवण म्हणून ब्रिटन कायमच जगात शांततापूर्ण निदर्शनाच्या हक्काच्या बाजूने उभा राहील.
वरील ओळीमधील कधीच या शब्दाखाली त्यांनी रेघ ओढली आहे. १९१९ मध्ये जनरल डायर यांनी दिलेल्या आदेशानंतर झालेल्या गोळीबारात जालियनवाला बागेमध्ये शेकडो लोकांचा बळी गेला होता.

Story img Loader