नामदेव कुंभार, औरंगाबाद
निवडणुकीतील यशापयशाची चिंता न करता जालना येथील एका उमेदवाराने आठ वेळा लोकसभा आणि १४ वेळा विधानसभा निवडणुक लढवली आहे. निवडणुकीच्या खर्चासाठी या अवलियानं आपली ५० एकर जमीन आणि घरदारही विकले आहे. पण एकही निवडणूकीत त्यांना विजय मिळवता आला नाही.
जालनापासून हाकेच्या अतंरावर असलेल्या बापकळ गावातील बाबासाहेब शिंदे यांची ही कथा. विषेश म्हणजे ७० च्या दशकात बाबासाहेब यांच्या प्रसिद्धीमुळे त्यांना काँग्रेसने तिकीटही देऊ केलं होतं. मात्र, शिक्षण घेत असल्यामुळे त्यांनी ते नाकारले. बाबासाहेब शिंदे यांनी जालना लोकसभा मतदार संघातून आठ वेळा अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा विक्रम केला आहे. जालन्यातून आठ वेळा लोकसभा लढवणारा हा एकमेव उमेदवार आहे. बाबासाहेब शिंदे यांनी १४ वेळा विधानसभेमध्येही नशीब अजमावले आहे. एका विधानसभा निवडणुकीत तर जालन्यातील पाचही मतदारसंघात बाबासाहेब उभे राहिले होते.
सध्या बाबासाहेब शिंदे यांची हलाखीची परिस्थिती आहे. राहण्यासाठी घरही नाही. पत्नी सोडून गेली आहे. मुल-बाळ नाही. ते गावाबाहेर माळावरील छोट्याशा मंदिराजवळ राहतात. तिथेच स्वत:च्या हाताने जेवण तयार करतात. रात्री, गावांमधील मंदिरात झोपण्यासाठी येतात. निवडणुकीच्या वेडापायी त्यांची ५० एकर जमीन आणि घरदारही गेलं. गावांमध्ये त्यांना मान-सन्मान आहे. मात्र, स्वत:च्या घरातच गड्याप्रमाणे काम करावे लागते. बाबासाहेब सांगतात, वडिलांची १५० एकर जमीन आम्हा तिन्ही भावामध्ये विभागून दिली होती. मला पहिल्यापासूनच समाजसेवा करण्याची आवड होती. मॅट्रीकचे शिक्षण घेताना काँग्रेसनं मला निवडणूक लढवण्याची गळ घातली होती. मात्र, त्यावेळी मी तरूण होते. शिक्षण सुरू होते. त्यामुळे मी काँग्रेसला नकार दिला. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत मी जालन्यातील प्रत्येक निवडणूकीच्या रिंगणात उतरलो आहे. यश मिळाले नाही त्याबद्दल मला कधीच खंत वाटली नाही. यापुढेही जर पैसे उपलबद्ध झाले तर निवडणुकीत नशीब अजमावणार आहे. जालना लोकसभा निवडणुकीत १९९९ चा अपवाद वगळता १९८४ नंतरच्या सर्वच निवडणुका त्यांनी लढविल्या आहेत. सोळाव्या लोकसभेसाठी झालेल्या २०१४ मधील निवडणुकीसाठी त्यांनी आठव्यांदा नामांकन दाखल केले होते. निवडणुकीतील यशापयशाची चिंता त्यांनी कधीही केली नाही. लोकसभा निवडणूक लढविण्याचा शिंदें एवढा अनुभव जालन्यातील कोणत्याही राजकीय व्यक्तीकडे नाही.