सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट सौदी अरेबियाच्या दुतावासातील एका अधिकाऱ्याच्या घरात लावण्यात आल्याचा संशय आहे. खाशोगी यांचे कपडे, लॅपटॉप आणि तीन सुटकेस सौदीच्या दुतावासात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडले आहेत. या अधिकाऱ्याच्या घरातच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचे वृत्त ‘स्काय न्यूज’ने दिले असून खाशोगी यांच्या मृतदेहाचे अवशेषही घरातील गार्डनमध्ये सापडल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.
अमेरिकेत वास्तव्यास असलेले सौदी अरेबियाचे पत्रकार, सौदी राजवटीवरील टीकाकाकर जमाल खाशोगी हे २२ दिवसांपूर्वी तुर्कस्तानमधील सौदी अरेबियाच्या दुतावासात गेले होते. तेथून ते परत बाहेर आलेच नाहीत. खाशोगी यांची हत्या करण्याचा आल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. तुर्कस्तानमधील तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून जगभराचे तपासाकडे लक्ष लागले आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी खाशोगी यांचे कपडे, लॅपटॉप आणि तीन सुटकेस सौदी अरेबिया दुतावासातील एका अधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडले आहेत. तर स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार खाशोगी यांच्या मृतदेहाचे अवशेषही सापडले आहेत. हे अवशेष सौदी दुतावासातील एका अधिकाऱ्याच्या घरात सापडले असून हे घर इस्तंबूलमधील सौदी दुतावासापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. या घरातील बगिच्यामध्येच खाशोगी यांच्या मृतदेहाची विल्वेहाट लावण्यात आल्याचा संशय असल्याचे स्काय न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र, मृतदेहाचे अवशेष मिळाल्याच्या वृत्ताला तूर्कस्तानमधील तपास यंत्रणांनी दुजोरा दिलेला नाही.
खाशोगी हे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे आखाती राजकारणविषयक स्तंभलेखक/पत्रकार होते. सौदी राजवटीवर त्यांनी अनेकदा टीका केली होती. यामुळे या प्रकरणात संशयाची सुई राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे वळली. २ ऑक्टोबर रोजी खाशोगी ज्यावेळी दुतावासात गेले त्याच वेळी दुतावासात सौदीतील १५ जणांचे पथकही तिथे पोहोचले होते. सौदीच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी मात्र प्रिन्स मोहम्मद यांना या हत्येची कल्पना नव्हती आणि त्यांनी कुणाचं अपहरण करावं वा हत्या करावी असा आदेश दिला नव्हता असं म्हटलं आहे.