अवकाशात दुरवर बघण्याची आणि विश्वातील पहिल्या दीर्घिकेच्या निर्मितीचे गूढ उलगडून दाखवण्याची अफाट क्षमता असलेली सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिण ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’च्या प्रेक्षपणाची, अवकाशात पाठवण्याची तारीख अखेर नासाने जाहीर केली आहे. येत्या १८ डिसेंबरला सुमारे ६.५ टन वजनाची अवकाश दुर्बिण दक्षिण अमेरिकेतील फ्रान्स देशाच्या फ्रेंच गयाना या तळावरुन युरोपियन स्पेस एजन्सीच्या एरियन -५ या शक्तीशाली प्रक्षेपकाच्या सहाय्याने प्रक्षेपित केली जाणार आहे.
नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडा स्पेस एजन्सी यांनी संयुक्तरित्या या अवकाश दुर्बिणीची निर्मिती केली आहे. नुकतंच कॅलिफोर्निया इथे या दुर्बिणीच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पुर्ण झाल्या. या दुर्बिणीच्या निर्मितीला २००५ ला सुरुवात झाली पण विविध कारणांनी या दुर्बिणीच्या निर्मितीला उशीर होत गेला. करोना काळामुळे काही महिने या दुर्बिणीचे काम ठप्प झाले होते. अखेर या दुर्बिणीला अवकाशात नियोजित ठिकाणी नेण्याचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. या दुर्बिणीच्या निर्मितीला १० अब्ज डॉलर्सपर्यंत खर्च आलेला आहे.
एका टेनिस कोर्टच्या पसाऱ्याएवढा या दुर्बिणीता विस्तार असून १८ छोट्या षटकोनी आरशांपासून बनवलेली ६.५ मीटर व्यासाची, सोन्याचा मुलामा असलेली बेरेलियम धातुने तयार केलेली भव्य लेन्स या दुर्बिणीत असणार आहे. व्हीजीबल ( दृश्य प्रकाश ), इन्फ्रोरेड आणि अल्ट्राव्हालेट अशा तीन प्रमुख तरंग लांबीच्या माध्यमातून अवकाशाचा वेध ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ घेणार आहे. या दुर्बिणीमुळे अवकाशातील अनेक रहस्या्चा उलगडा होणार असून विश्व निर्मितीबाबत आणखी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. पृथ्वीभोवती प्रदक्षिण घालणारी प्रसिद्ध अवकाश दुर्बिण ‘हबल’ चे काम जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आणखी पुढे नेणार आहे.