ओसामा बिन लादेनची ‘अल-कायदा’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने आता जम्मू-काश्मीरमध्ये पाय रोवण्याची तयारी केली आहे. काश्मीरमधील दहशतवादाचा चेहरा आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मुसाला अल-कायदाने जम्मू-काश्मीरमधील प्रमुख म्हणून नेमले आहे. ‘अल-कायदा’च्या या घोषणेनंतर गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
‘अल-कायदा’च्या अधिकृत वाहिनीवरुन झाकीर मुसाची जम्मू- काश्मीरमधील कमांडर म्हणून निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. ‘अल-कायदा’ने पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय असल्याची जाहीर कबुली दिली आहे. गेल्या वर्षभरापासून हिंसाचाराने धुमसणाऱ्या जम्मू-काश्मीरसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे.
चंदीगडमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेला झाकिर मुसा हा सुशिक्षित कुटुंबातील तरुण आहे. शिक्षण अर्धवट सोडून झाकीर दक्षिण काश्मीरमधील पुलवामामधील मूळगावी परतला. कट्टर इस्लामी साहित्यामुळे झाकिर मुसा दहशतवादाकडे वळाला. हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत तो भरती झाला. बुरहान वानीनंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा चेहरा म्हणून तो समोर आला होता. वानीनंतर तो हिज्बुलचा कमांडर असेल अशी चर्चाही रंगली होती. पण फुटिरतावाद्यांची भरचौकात हत्या केली पाहिजे अशी धमकी दिल्याने त्याची हिज्बुल मुजाहिद्दीनमधून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर त्याने ‘अल-कायदा’मध्ये प्रवेश केला होता. जम्मू-काश्मीरमध्ये शरिया कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करु असे झाकीर मुसाने जाहीर केले होते.
झाकीर मुसाच्या निवडीच्या वृत्ताला जम्मू-काश्मीरमधील पोलीस महासंचालक एसपी वैद यांनी दुजोरा दिला. ‘सोशल मीडियावर झाकीरची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आम्ही याविषयी अधिक माहिती घेत आहोत’ असे वैद यांनी म्हटले आहे. अल कायदाने पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरसाठी घोषणा केली आहे. पण यामुळे फार फरक पडत नाही. दहशतवादी कोणत्याही संघटनेचा असो पण आमच्यासाठी तो एक दहशतवादीच असतो असे वैद यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना सक्रीय नसल्याचा पोलिसांनी वेळोवेळी केला होता. मात्र अल कायदा आणि आयसिस या दोन्ही संघटनांचे झेंडे जम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वीही झळकले होते. आता अल कायदाने अधिकृत घोषणा केल्यावर गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ने अल कायदाच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. हिज्बुलचे प्रवक्ता सय्यद सलाहुद्दीन म्हणाला, जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेची गरज नाही. आमचा लढा स्वातंत्र्य आणि इस्लामसाठी आहे. अल कायदामुळे आमच्या लढ्यात अडथळे येत असल्याचा आरोप त्याने केला.