जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे सोमवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीनंतर राज्यातील इंटरनेट सेवा पुन्हा बंद करण्यात आली. सोमवारी रात्री पोलीस आणि सीआरपीएफनं केलेल्या एका जॉईंट ऑपरेशनदरम्यान ही चकमक झाली.

मध्यरात्रीच्या सुमारास दाट लोकसवस्तीच्या भागात जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफनं दहशतवाद्यांची शोधमोहिम सुरू केली होती. यादरम्यान पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी काही घरांना घेरलं. त्यावेळी काही दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या चकमकीनंतर जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्यात आली.

श्रीनगरमधील नवाकदल परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीबद्दल जम्मू काश्मीर पोलिसांच्या काश्मीर झोनच्या पोलिसांनी एक ट्विट केलं. “श्रीनगकच्या कानेमजार नवाकदस भागात एन्काऊंटर सुरू झालं आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ आपलं काम करत आहेत. पुढील माहिती दिली जाईल,” असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं.

यापूर्वी २८ एप्रिल रोजी शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. १७ मे रोजी जम्मू काश्मीरमधी डोडा येथे सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला होता. तर यादरम्यान एका दहशतवाद्यालाही ठार करण्यात आलं होतं.