Jammu and Kashmir Assembly Rucks over Waqf Act: जम्मू आणि काश्मीर विधानसभा सभागृहात सलग तिसऱ्या दिवशी वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान जोरगार राडा झाला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार मुबारक गुल, भाजपाचे बलवंत सिंह कोटिया यांच्यासह अनेक आमदारांनी आपापल्या जागेवर उभे राहून त्यांच्या प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. याचदरम्यान भाजपाचे आमदार आणि आम आदमी पक्षाचे एकमेव आमदार मेहराज मलिक यांच्यात हाणामारी झाली. या गदारोळात सभागृहाचे कामकाज दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
सभागृहात गदारोळ झाल्यानंतर भाजपाचे आमदार विक्रम रंधावा यांनी आमदार मेहराज मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “मलिक यांनी हिंदूंचा अपमान केला. आम्ही हे सहन करणार नाहीत. ते म्हणाले की, हिंदू टिळा लावून पाप करतात. आम्ही त्यांना उत्तर देणारच.”
सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांच्या सहयोगी पक्षानी वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र विधानसभेचे अध्यक्ष अब्दुल रहीम लाथर यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.
दरम्यान जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी केंद्र सरकारवर आरोप केला की, मुख्य प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी भलतेच मुद्दे काढले जात आहेत. आम्ही रोजंदारी करणाऱ्या मजुरांचे वेतन, युवकांमधील बेरोजगारी यासारख्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी करतो होतो. पण सरकार या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तयार नाही.
मलिक यांनी शिवगाळ केल्याचा आरोप
भाजपाने सांगितले की, आपचे आमदार मेहराज मलिक शिवीगाळ करत होते. भाजपा नेत्यांवर ते वारंवार आरोप करत राहिल्यामुळे भाजपा आमदारही त्यांच्यावर तुटून पडले. त्यानंतर हाणामारीचे हे लोण सभागृहाबाहेरही पोहोचले आणि त्यानंतर सेंट्रल हॉलपर्यंत याची चर्चा होती.