जम्मू :जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील प्रसिद्ध भद्रवाह राजमश (राजमाची एक जात) आणि रामबनच्या सुलाई मधास भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘जीआय’ दर्जा मिळाल्यानंतर या भागातील लोकप्रिय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळेल. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले, की या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील ही उत्पादने आणखी लोकप्रिय होण्यास मदत होईल.
जितेंद्र सिंह यांनी ‘एक्स’वर नमूद केले, की उधमपूर-कठुआ-दोडा लोकसभा मतदारसंघांना आणखी मान मिळाला आहे. बसोहली चित्रशैलीनंतर भद्रवाह राजमा आणि रामबन सुलाई मधास भौगोलिक मानांकन (जीआय मानांकन) मिळाले आहे. सिंह हे उधमपूर-कठुआ-डोडा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. जम्मूमधील संस्थांनी गेल्या वर्षी जम्मू विभागातील विविध जिल्ह्यांतील आठ वेगवेगळय़ा पारंपरिक वस्तूंसाठी ‘जीआय मानांकना’साठी अर्ज केला होता.
हेही वाचा >>> मध्य प्रदेशातील कारखान्यात विषारी वायूमुळे पाच मृत्युमुखी
जम्मूचे कृषी उत्पादन आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक के. के. शर्मा यांनी सांगितले, की दोडा आणि रामबन जिल्ह्यांना आज दोन भौगोलिक मानांकन मिळाली आहेत. एक म्हणजे भद्रवाहचा राजमा ज्याला ‘लाल बिन’ म्हणतात.रामबन जिल्ह्यातील सुलाई मधासही हे मानांकन मिळाले आहे. चिनाब खोऱ्यातील ही दोन महत्त्वाची उत्पादने आहेत. ही उत्पादने या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाची माध्यमे आहेत. ‘जीआय’मुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.
हेही वाचा >>> ८० टक्के भारतीयांची मोदींना पसंती; ‘प्यू रीसर्च सेंटर’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१५ मध्ये ब्रिटन दौऱ्यात ब्रिटनच्या तत्कालीन राणी एलिझाबेथ यांना सुलाई मध भेट दिला होता. शर्मा यांनी सांगितले, की आमच्या विभागाने या उत्पादनास भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती. परिणामी मंगळवारी हे मानांकन मिळाले. त्यामुळे अशा उत्पादनांचा त्रयस्थांद्वारे गैरवापरास प्रतिबंध होतो. ‘जीआय’ मानांकन हा बौद्धिक संपदा अधिकारांचा (आयपीआर) एक प्रकार आहे. जो विशिष्ट भौगोलिक स्थानातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांची ओळख निश्चित करतो. या स्थानाशी संबंधित विशिष्ट निसर्ग, गुणवत्ता आणि वैशिष्टय़े त्यात अधोरेखित होतात. आता फक्त अधिकृत वापरकर्त्यांला या उत्पादनांच्या संबंधात भौगोलिक मानांकन वापरण्याचा विशेष अधिकार आहे. कोणतीही व्यक्ती त्याची भौगोलिक वैशिष्टय़ांची नक्कल करू शकत नाही. एखाद्या उत्पादनाला ‘जीआय’ दर्जा मिळाल्याने त्या भागातील लोकांची आर्थिक सुबत्ता वाढते.