एक्सप्रेस वृत्त
श्रीनगर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर आम्ही दिशाहीन झालो अशा शब्दांमध्ये जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी विधानसभेत वाजपेयींचे स्मरण केले. वाजपेयींनी आखून दिलेल्या मार्गाचे पालन झाले असते तर जम्मू आणि काश्मीरची परिस्थिती भिन्न राहिली असती अशी आशा अब्दुल्ला यांनी बोलून दाखवली.
विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाचे मृत सदस्य आणि महत्त्वाच्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहताना ओमर अब्दुल्ला बोलत होते. यावेळी गेल्या सहा वर्षांमध्ये निधन पावलेल्या नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यामध्ये हुर्रियत कॉन्फरन्सचे वादग्रस्त फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचाही समावेश होता. अब्दुल्ला म्हणाले की, ‘‘माझी खात्री आहे, जर आपण वाजपेयींनी आखून दिलेल्या मार्गाचे पालन केले असते तर आपण आता या स्थितीत नसतो. ते आता नाहीत आणि आपण दिशाहीन झालो आहोत.’’
वाजपेयींनी लाहोरला जाऊन ‘मिनार-ए-पाकिस्तान’ला भेट दिल्याच्या कृतीची त्यांनी प्रशंसा केली. कोणत्याही भारतीय नेत्यासाठी असे करणे फार अवघड होते असे अब्दुल्ला म्हणाले. पाकिस्तानला जाताना वाजपेयी म्हणाले होते की, आपण मित्र बदलू शकतो, शेजारी नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी चर्चा हा मार्ग आहे असे त्यांनी सांगितल्याची ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी सभागृहाला सांगितले.
© The Indian Express (P) Ltd