जम्मू-काश्मीरमध्ये गेला आठवडाभर धुमाकूळ घालणारा प्रलयंकारी पूर आता पूर्णपणे शांत झाला आहे. मात्र श्रीनगर तसेच दक्षिण काश्मीरमधील अनेक शहरे, गावे व वस्त्यांमध्ये पुराचे पाणी अद्याप ओसरलेले नाही. या ठिकाणी लाखो नागरिक अद्याप आपापल्या घरांच्या अथवा अन्य इमारतींच्या छतांवर अथवा झाडांच्या फांद्यांवर अडकून पडले असून त्यांना सोडवण्यासाठी लष्कर तसेच एनडीआरएफचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
मात्र आपल्या प्रिय नातेवाइकांची काहीही खबरबात मिळत नसल्याने संतप्त झालेल्या काही नागरिकांनी एनडीआरएफच्या जवानांवर आपला राग काढत काही मदतनौकांचीही नासधूस केली; तर काश्मीरमधील काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते सैफुद्दिन सोझ यांनाही नागरिकांच्या रोषाचे धनी व्हावे लागले. मदतकार्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सोझ यांना पूरग्रस्तांनी धक्काबुक्की केली. मात्र या साऱ्या पाश्र्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये मदतकार्याची धुरा प्रामुख्याने वाहणाऱ्या लष्कराने आपल्या परंपरेला साजेशी कामगिरी करीत हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्याचे काम सुरूच ठेवले आहे. लष्कर दिवसरात्र काम करीत राहील, अशी नि:संदिग्ध ग्वाही लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी दिली आहे.जम्मू-काश्मीरमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतल्याने मदतकार्य वेगाने सुरू राहिले. परंतु अजूनही सुमारे ३-४ लाख नागरिक श्रीनगर, बारामुल्ला व अन्य शहरांमध्ये अडकून पडले आहेत. पुराचे पाणी न ओसरल्याने विविध ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. परंतु नागरिकांच्या तुलनेत मदतनौकांची संख्या अपुरी असल्याने एवढय़ा नागरिकांना सुरक्षितस्थळी आणण्यात अनेक अडचणी येत आहेत. हे अडकलेले नागरिक गेले अनेक दिवस तुटपुंज्या अन्नावर तग धरून आहेत. त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना तातडीने अन्न मिळेल याची काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील शेवटच्या नागरिकाची सुखरूप सुटका केल्याशिवाय लष्कर विश्रांती घेणार नाही. दिवसरात्र जवान काम करीत राहतील, अशी ग्वाही लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा