Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर भारताने २३ एप्रिल रोजी काही महत्वाचे निर्णय घेत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले. एवढंच नाही तर सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता जम्मू-काश्मीर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील भागातील तब्बल ५० पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

पहलगाम येथे गेल्या आठवड्यात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील देखील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेच्या संदर्भाने आणि खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीर सरकारने काश्मीर खोऱ्यातील जवळपास ५० पर्यटन स्थळे आणि ट्रेकिंग ट्रेल्स बंद करण्याचा निर्णय आज घेतला आहे.

काश्मीरमधील कोणते पर्यटन स्थळे बंद करण्यात आले?

दरम्यान, बंद करण्यात आलेल्या ५० पर्यटन स्थळांमध्ये आणि ट्रेकिंग ट्रेल्समध्ये गुरेझ व्हॅली (Gurez Valley), दूधपथरी, वेरीनाग, बंगस व्हॅली आणि युसमार्ग सारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा समावेश आहे. या संदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितलं की, “पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे, असे पर्यटन स्थळे खुली आहेत.”

तसेच बंद करण्यात आलेल्या पर्यटनाच्या ठिकाणांपैकी एक असलेले गुरेझ हे बांदीपोरा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील एक दरी आहे. हे ठिकाणी देखील पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय मानलं जातं. तसेच दूधपथरी, कुपवाडा येथील बंगस व्हॅली आणि अनंतनाग येथील वेरीनाग, शोपियां येथील उंचावरील कौसरनाग तलाव, कौसरनाग हे ठिकाणही पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. या बरोबरच उरी येथील कमान चौकी हे ठिकाण देखील बंद करण्यात आले आहे. या बरोबरच श्रीनगर शहरात मध्यभागी असलेल्या जामिया मशिदीला भेट देण्याची परवानगी देखील न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.