भारतीय सैन्याला पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. गेल्य ९६ तासांमध्ये सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या १३ घुसखोरांना कंठस्नान घातले आहे. सैन्याच्या सतर्कतेमुळे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.

भारत – पाकिस्तान सीमारेषेवर तणाव असून पाकमधून घुसखोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सीमा रेषेवर सैन्याची करडी नजर असून घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावले जात आहे. गेल्या ९६ तासांत १३ घुसखोरांना कंठस्नान घालण्यात आले आहे. शुक्रवारी ९ जून रोजी सैन्याने ५ घुसखोरांना कंठस्नान घातले होते. उरी सेक्टरमध्ये ही चकमक झाली होती. तर १० जूनला गुरेज सेक्टरमध्येही सैन्याच्या जवानांनी घुसखोरीचा डाव उधळून लावला होता. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. गुरेजमध्ये तीन ते चार दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते. सैन्याच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात एकाचा खात्मा झाला तर उर्वरित दहशतवाद्यांनी पळ काढला होता. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.

जम्मू- काश्मीरमधील केजी सेक्टरमध्ये शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, उरी सेक्टरमध्ये कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांचे छायाचित्र सैन्याने रविवारी प्रसिद्ध केले. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केल्याचे सैन्याने सांगितले.