जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे (एलईटी) दोन श्रीनगरस्थित दहशतवादी ठार झाले तर सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
श्रीनगरच्या दानमर परिसरातील आलमदार वसाहतीमध्ये दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानंतर सीआरपीएफ आणि पोलिसांनी संयुक्तपणे या परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली. दहशतवाद्यांचा ठावठिकाणा लागल्यानंतर त्यांना शरण येण्यास सांगण्यात आले, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला, त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले असता चकमक उडाली. या चकमकीत एलईटीचे दोन दहशतवादी ठार झाले, त्यांचे मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले, इरफान अहमद सोफी आणि बिलाल अहमद भट अशी त्यांची नावे असून ते दोघेही श्रीनगरमधील नातीपोरा परिसरातील रहिवासी आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चकमकीत एक पोलीस आणि सीआरपीएफचा एक जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.