अमरनाथ यात्रेवरुंवरील हल्ल्यात सामील असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला सोमवारी चकमकीत कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यापैकी एक दहशतवादी चकमकीत जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिघेही दहशतवादी ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधीत आहेत.

अमरनाथ यात्रेकरूंवर १० जुलैरोजी झालेल्या हल्ल्याचा ‘लष्कर ए तोयबा’चा कमांडर अबू इस्माईल हा सूत्रधार होता. अबू इस्माईलच्या गटातील तीन दहशतवादी पुलवामा जिल्ह्यात संबूरा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रविवारी रात्रीपासून या भागात पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली होती. पोलीस आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले. तर उर्वरित दोन्ही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी घटनास्थळावरुन शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

चकमकीत मृत्यू झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून उमर असे त्याचे नाव असून तो मूळचा पाकिस्तानचा रहिवासी आहे. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यात त्याचा सहभाग होता असे वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. ‘पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादापासून जम्मू-काश्मीरला मुक्त करु’ अशी प्रतिक्रिया राज्याचे पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली.

अनंतनाग येथे झालेल्या अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा संपूर्ण कट कसा आखला गेला, याची सविस्तर माहिती रविवारी पोलिसांनी जाहीर केली होती. या हल्ल्याच्या चौकशीसाठी पोलीस महानिरीक्षक एसपी पनी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. या पथकाने रविवारी पत्रकार परिषदेत तपासात काय निष्पन्न झाले याचा उलगडा केला होता. दहशतवाद्यांनी ९ जुलैलाच अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करायचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी यात्रेकरूंच्या बसभोवती असलेल्या कडेकोट लष्करी बंदोबस्तामुळे हा प्रयत्न फसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली होती. दहशतवाद्यांनी बससाठी ‘शौकत’ आणि सीआरपीएफच्या वाहनासाठी ‘बिलाल’ हे कोडवर्ड वापरले होते असे पोलीस महानिरीक्षक एसपी पनी यांनी सांगितले.

Story img Loader