प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट रचल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पुण्यातील तरुणीची सुटका करण्यात आली आहे. १० दिवस कसून चौकशी केल्यानंतर काहीच संशयास्पद न आढळल्याने त्या तरुणीची सुटका करण्यात आली आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर भेटलेल्या काश्मिरी तरुणाशी लग्न करण्यासाठी ती जम्मू-काश्मीरमध्ये आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पुण्यात राहणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणीला जम्मू- काश्मीर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. पुण्यातील तरुणी जम्मू- काश्मीरमध्ये घातपात घडवण्यासाठी आली असून प्रजासत्ताक दिनी ती आत्मघाती हल्ला घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. यानंतर जम्मू -काश्मीर पोलिसांनी २५ जानेवारी रोजी तिला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात देखील केली होती. दक्षिण काश्मीरमधून तिला ताब्यात घेण्यात आले होते. ती कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होती, हे मात्र समोर आले नव्हते.

सलग १० दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्या तरुणीला सोडून दिले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार चौकशीत काहीच संशयास्पद गोष्ट समोर आली नाही. ‘तरुणीची सोशल नेटवर्किंग साईटद्वारे एका काश्मिरी तरुणाशी ओळख झाली होती. त्याच्याशी लग्न करण्यासाठीच ती जम्मू-काश्मीरमध्ये आली होती. मुलीची आई गेल्या आठवड्यात जम्मू- काश्मीरमध्ये आली होती. चौकशीनंतर आम्ही मुलीला तिच्या आईच्या ताब्यात दिले. आता त्या दोघी पुण्याला रवाना झाल्या आहेत’, असे जम्मू- काश्मीर पोलिसांनी सांगितले. तिच्याबाबत मिळालेली माहिती खोटी होती, असे पोलिसांनी नमूद केले.

काय होते प्रकरण?
दोन वर्षांपूर्वी पुण्यातील येरवडा येथे राहणारी १६ वर्षांची मुलगी फेसबुकवर राजस्थानमधील एका तरुणाच्या संपर्कात आली. त्या तरुणाने तिचे ब्रेनवॉशिंग केले आणि तिला आयसिसमध्ये भरती होण्यासाठी तयार केले. ती सीरियात देखील जाणार होती. मात्र पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी तिचे समुपदेशन केले. जवळपास दोन महिने समुपदेशन केल्यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली. अल्पवयीन असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र पोलिसांचे पथक तिच्यावर नजर ठेवून होते. तीच तरुणी दोन वर्षांनी पुन्हा घरातून पळाली आणि जम्मू- काश्मीरमध्ये गेली. त्यामुळे तपास यंत्रणांच्या ती रडारवर आली.

Story img Loader