जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. काश्मीरमध्ये रंगलेल्या या राजकीय नाटयामध्ये राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या कार्यालयातील फॅक्स मशीनही चर्चेत आली आहे. पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती आणि पीपल्स कॉन्फरन्सच्या सज्जाद लोन यांनी सरकार स्थापनेसाठी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केल्यानंतर राज्यपालांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

पण राज्यपालांच्या कार्यालयातील फॅक्स मशीन बिघडल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी दोन्ही नेते फॅक्स द्वारे राज्यपालांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मेहबूबा मुफ्ती यांनी या फॅक्स मशीनवरुन टोलाही लगावला. तंत्रज्ञानाच्या या युगात राज्यपाल कार्यालयातील फॅक्स मशीन चालत नाही हे कसे शक्य आहे ?

तंत्रज्ञानाच्या या युगात राज्यपाल निवासस्थानातील फॅक्स मशीनला आमचा फॅक्स मिळत नाही पण विधानसभा बरखास्तीचा आदेश निघतो असे टि्वट मुफ्ती त्यांनी केले आहे. फॅक्स मिळत नसल्यामुळे त्यांनी टेलिफोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो ही प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

सज्जाद लोन यांना सुद्धा तोच अनुभव आला. फॅक्स मशीन चालत नसल्यामुळे त्यांनी राज्यपालांच्या पीएला सत्ता स्थानपनेच्या दाव्याचे पत्र व्हॉट्स अॅप केले. नॅशनल कॉन्फरनसच्या ओमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल कार्यालयाला तात्काळ नव्या फॅक्स मशीनची आवश्यकता असल्याचे टि्वट केले आहे.