नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ३५ वर्षांतील सर्वाधिक मतदान झाले असून २०१९ च्या तुलनेत काश्मीर खोऱ्यात ३० टक्के अधिक मतदान झाले आहे. निवडणुकीचा उत्साह पाहून जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांबाबत माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी हा सक्रिय सहभाग खूप सकारात्मक आहे, जेणेकरून या केंद्रशासित प्रदेशात लोकशाही प्रक्रिया सुरू राहील, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>> रेमल चक्रीवादळाने १५ हजार घरांचे नुकसान ; २ लाख ७ हजार ६० नागरिकांचे स्थलांतर
जम्मू-काश्मीरमध्ये पाच लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदान केंद्रांवर एकूण ५८.४६ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. श्रीनगर, बारामुल्ला आणि अनंतनाग-राजौरी येथे अनुक्रमे ३८.४९ टक्के, ५९.१० टक्के आणि ५४.८४ टक्के मतदान झाले, जे गेल्या तीन दशकांतील सर्वाधिक आहे.
‘तरुणांचा सहभाग सकारात्मक’
काश्मीर खोऱ्यातील अधिक तरुणांनी विश्वास दाखवून लोकशाहीचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला आहे. १८-५९ वयोगटातील मतदारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. काश्मीरमधील अधिक मतदानाची टक्केवारी त्यांच्या लोकशाहीवरील विश्वासाचे प्रतिबिंब आहे, जो एक सकारात्मक आणि आनंददायक विकास आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये १८-५९ वयोगटातील ८० टक्के मतदारांनी मतदान केले, असे आयोगाने सांगितले.