Pahalgam Terror Attack Viral Photos दहशवादी हल्ल्याने काश्मीर हादरलं आहे. या हल्ल्यात सुमारे २० पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन पर्वतावर फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या गटावर दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. या घटनेत २० पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान एक हृदय पिळवटून टाकणारा फोटो समोर आला आहे.

हृदय पिळवटून टाकणारा फोटो समोर

दहशतवादी हल्ल्यासंदर्भात प्रत्यक्षदर्शींचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. दरम्यान एक हृदय पिळवटून टाकणारा फोटो समोर आला आहे. एक नवविवाहिता मधुचंद्रासाठी पहलगाम या ठिकाणी गेली होती. तिचा नवरा गोळीबारात ठार झाला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ ती स्तब्ध बसून आहे. तिचा हा मूक आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ठरला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी काय काय सांगितलं?

एका पर्यटकाने सांगितल्यानुसार दहशतवाद्यांनी पर्यटकांना नावं विचारुन ठार केलं. एक महिला रडत तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी टाहो फोडत होती हे दृश्यही कॅमेरात कैद झालं आहे. जो माणूस व्हिडीओ रेकॉर्ड करत होता तो तिला शांत राहण्याचं आवाहन करत होता असाही एक व्हिडीओ समोर आला आहे. एक लहान मुलगा सांगतो ते लोक समोरुन आले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. माझ्या नवऱ्याला दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केलं असं एका आक्रोश करणाऱ्या महिलेने सांगितलं.

अमित शाह यांनी काय सांगितलं?

या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत यासाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असे म्हटले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मी व्यथित झालो आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना माफ केले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे अमित शाह म्हणाले आहेत.

मेहबुबा मुफ्तींनी काय म्हटलं आहे?

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला. या घटनेत ज्यांना दुखापत झाली, त्या कुटुंबियांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. या हल्ल्यामागे फक्त येथील शांतता भंग करून विनाकारण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो. अशा हल्ल्याचे कधीही समर्थन करता येणार नाही.