Jammu & Kashmir Terrorist Attack : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये गस्तीवर असलेल्या एका पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) एक अधिकारी शहीद झाले आहेत. कुलदीप सिंग असं या शहीद झालेल्या सीआरपीएफच्या अधिकाऱ्याच नाव होतं, अशी माहिती सांगितली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमधील चील आणि दुडू भागात जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे विशेष पथक गस्तीवर होतं. यावेळी दहशतवाद्यांनी या पथकावर गोळीबार केला. यानंतर पोलीस आणि सीआरपीएफच्या विशेष पथकाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र, या चकमकीमध्ये सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्याला गोळी लागली. यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत असताना त्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सध्याही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती सांगितली जात आहे.

हेही वाचा : Kolkata Rape Case : पीडितेच्या शरीरावर १४ जखमा, फुफ्फुसात रक्तस्राव तर गुप्तांगात आढळला चिकट द्रव्य; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर!

जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं की, सीआरपीएफचे जवान दुडू परिसरात गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर सुरक्षा दलातील जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. पण दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्याला वीरमरण आलं, असं जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांकडून कडक करवाई करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी १४ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक झाली होती. या चकमकीत कॅप्टन दीपक सिंग हे लष्करी अधिकारी शहीद झाले होते.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये गस्तीवर असलेल्या एका पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर आता त्या संपूर्ण परिसरामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी अधिक सैन्य तैनात करण्यात आलं असून दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu and kashmir terrorist attack a crpf officer martyred in a terrorist attack in udhampur gkt